जाहिरात

'महावतार नरसिंम्हा' इतका यशस्वी का झाला? उत्तर तुम्हालाही माहिती आहे

Mythological Animated Movie Mahavatar Narsimha: भारतीय सिनेमासाठी आशादायक गोष्ट घडली आहे. ती म्हणजे, दिग्दर्शक अश्विन कुमार यांच्या 'महावतार नरसिम्हा' (Mahavatar Natsimha) या ॲनिमेटेड सिनेमाची त्सुनामी.

'महावतार नरसिंम्हा' इतका यशस्वी का झाला? उत्तर तुम्हालाही माहिती आहे
मुंबई:

नरेंद्र बंडबे

गेल्या काही दिवसांत भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये दोन महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. 'सैयारा' (Saiyyara) या सिनेमाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला, तरुणाईच्या जोरावर कोट्यवधींचा गल्ला जमवला आणि रील्सचा पाऊस पाडला. पण यापेक्षाही एक मोठी आणि भारतीय सिनेमासाठी आशादायक गोष्ट घडली आहे. ती म्हणजे, दिग्दर्शक अश्विन कुमार यांच्या 'महावतार नरसिम्हा' (Mahavatar Natsimha) या ॲनिमेटेड सिनेमाची त्सुनामी. हा सिनेमा लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. भारतीय पौराणिक कथेवर आधारित हा सिनेमा पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली. लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सर्वच प्रेक्षक 'महावतार नरसिंहा' पाहण्यासाठी थिएटरमध्ये येत आहेत. यामुळे भारतात ॲनिमेशन सिनेमाच्या एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे.

( नक्की वाचा: 'महावतार नरसिम्हा'तील नरसिंहाचा आवाज कोणाचा आहे माहिती आहे का ? )

ॲनिमेशनचा प्रभावी वापर

आपल्या देशात पौराणिक कथांचा खजिना आहे. लहानपणी आपण सर्वांनीच विष्णूच्या अवतारांच्या अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. त्यापैकीच एक रंजक गोष्ट म्हणजे नरसिंह अवताराची आणि भक्त प्रल्हादाची. 'महावतार नरसिम्हा' मध्ये, दिग्दर्शक अश्विन कुमार यांनी चराचरात देव पाहणाऱ्या भक्त प्रल्हाद आणि स्वतःलाच देव मानणाऱ्या असुर हिरण्यकश्यपूची ही कथा ॲनिमेशनच्या अनोख्या शैलीत मांडली आहे. या सिनेमात वराह आणि नरसिंह या दोन कथांचा संगम आहे. यात प्रल्हादाची भक्ती आणि हिंसेलाच सर्वस्व मानणारा हिरण्यकश्यपू यांच्यातील संघर्ष प्रेक्षकांना एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. इथे चांगुलपणाचा वाईटावर विजय हा विचार नव्या ॲनिमेशन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे.

व्हिडीओ गेमचा आनंद मिळतो

पुराणानुसार, खांबातून नरसिंह प्रकट होतात आणि हिरण्यकश्यपूचा वध करतात. सिनेमात नरसिंह आणि हिरण्यकश्यपू यांच्यातील लढाई तब्बल 10 ते 12 मिनिटांची आहे. ही लढाई इतकी चित्तथरारक आहे की प्रेक्षक खिळून राहतात. दिग्दर्शकाने इथे व्हिडीओ गेममधील थराराचा वापर करून हे द्वंद्व सिनेमॅटिक बनवले आहे. व्हिडीओ गेम खेळताना जो अनुभव येतो, तोच रोमांच प्रेक्षकांना हा सिनेमा पाहताना मिळतो. हे द्वंद्वच या सिनेमाचा परमोच्च बिंदू आणि युनिक सेलिंग पॉइंट ठरला आहे.

( नक्की वाचा: फाडून टाकले! सन ऑफ सरदार-2 आणि धडक-2 नरसिंहापुढे हरले )

इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. भारतीय पौराणिक कथा असली तरी, हा महत्त्वाचा क्षण टिपताना दिग्दर्शक अश्विन कुमार यांनी 'असुर'ज व्राथ' (Asura's Wrath) आणि 'मॉर्टल कॉम्बॅट' (Mortal Kombat) यांसारख्या गेम्समधून प्रेरणा घेतली आहे. यामुळेच प्रेक्षक या कथेमध्ये अधिक रमून जातात. 'महावतार नरसिंहा'ची ॲनिमेटेड कथा दिग्दर्शकाने अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. लहानपणी ऐकलेल्या गोष्टी पुन्हा पडद्यावर का पाहाव्यात, असा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी एकच उत्तर आहे- आपल्या पौराणिक कथा नव्या स्वरूपात, नव्या तंत्रज्ञानाच्या अविष्कारात पाहण्याचा आनंद घेण्यासाठी 'महावतार नरसिंहा' नक्कीच पाहावा.

महावतार देऊ शकतात हॉलीवूडच्या सुपरहिरोंना टक्कर

हॉलिवूडमध्ये 'ब्लॅक मिथ वुकाना' (Black Myth Wukong), 'गॉड ऑफ वॉर' (God of War) आणि 'थॉर' (Thor) सारखे ग्रीक पौराणिक कथांवर आधारित सिनेमे खूप यशस्वी झाले आहेत. मार्व्हल (Marvel) सिरीजने सुपरहिरोंचा एक मोठा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. कथा, कॉमिक्स आणि टीव्हीच्या माध्यमातून हे सुपरहिरो थिएटर्समध्ये आले. ही गोष्ट फक्त 70-80 वर्षांची आहे. भारतातल्या पौराणिक कथांना मात्र हजारो वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तरुण प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे आणि त्यांनाही ती आवडत आहे, हे चित्र खूपच आशादायक आहे. 'महावतार' सिनेमाची 7 भागांची सिरीज येणार आहे. 'महावतार नरसिंहा' नंतर लवकरच 'महावतार परशुराम'ची गोष्ट येणार असल्याची घोषणा दिग्दर्शकाने केली आहे. त्यामुळे, आता हॉलिवूडच्या पौराणिक आणि सुपरहिरोंना आपले महावतार टक्कर द्यायला सज्ज झाले आहेत, असे म्हणायला हरकत नाही.

(लेखक सिने समीक्षक आहेत. ते फिप्रेस्की या आंतरराष्ट्रीय समीक्षक संघटनेचे सदस्य आहेत आणि गोल्डन ग्लोब्स पुरास्काराचे आंतरराष्ट्रीय मतदार आहेत)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com