बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना या क्षेत्रात येण्यापूर्वी मोठा संघर्ष करावा लागला होता. त्यातील एका अभिनेत्रीचं आयुष्य उलगडण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात येणार आहे. ही अभिनेत्री आपल्या बिनधास्त आणि बोल्ड राहणीमान-वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. ही अभिनेत्री बॉलिवूडमधील आयटम गाण्यांसाठी ओळखली जाते. तिने अनेक रिअॅलिटी कार्यक्रमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय ती आपले नातेसंबंध आणि लग्नाच्या किश्श्यांमुळेही चर्चेत असते.
25 नोव्हेंबर 1978 रोजी मुंबईत जन्म घेतलेल्या 45 वर्षीय राखी सावंत बॉलिवूडमधील आयटम गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे. राखीचे वडील आनंद सावंत मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल होते. राखी अनेकदा आपल्या आयुष्यातील अडचणींविषयी माध्यमांशी बोलत असते. तिचं बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेल्याचं तिने अनेकदा सांगितलं आहे. तिने वयाच्या 10 व्या वर्षापासून काम सुरू केलं होतं. वयाच्या 10 व्या वर्षी राखीने मुंबईतील एका लग्नात वाढपीचं काम केलं होतं, यासाठी तिला 50 रुपये मिळाल्याचं राखीने सांगितलं आहे.
मात्र कॉस्मेटिक सर्जरी केल्यानंतर तिच्या चेहऱ्यात आणि शरीरात मोठा बदल झाला. यानंतर 1997 मध्ये अग्निचक्र चित्रपटातून तिला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. याशिवाय 'जोरू का गुलाम', 'ये रास्ते है प्यार के', 'चुरा लिया है तुमने', 'जिस देश मे गंगा रहता है' यांसारख्या चित्रपटातही राखीने भूमिका साकारल्या आहेत. त्यातही 'चुरा लिया है तुमने' या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं 'मोहब्बत है मिर्ची' या गाण्याने तिचं नशीब पालटलं. चार वेळा ऑडिशन दिल्यानंतर तिला या गाण्यासाठी निवडण्यात आलं. 'क्रेजी ४' या चित्रपटातील गाणंही प्रचंड व्हायरल झालं होतं. यानंतर 'मस्ती', 'मै हूं ना' यासांरख्या चित्रपटात राखीने छोट्या-मोठ्या भूमिका साकरल्या.
चित्रपटात काम केल्यानंतर 2006 मध्ये राखी बिग बॉसच्या पहिल्या सिजनमध्ये दिसली. याशिवाय स्पर्धेच्या अंतिम चार जणांमध्ये राखीचं नाव होतं. यानंतर 2015 मध्ये पुन्हा एकदा राखीला बिग बॉसच्या घरात एन्ट्री मिळाली. या सिजनमुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. मात्र यावेळी तिने 14 लाख घेऊन बिग बॉसचं घर सोडण्याचा निर्णय घेतला होता.
राखीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर राखीचं नाव डान्सर अभिषेक अवस्थीसोबत जोडलं गेलं होतं. मात्र त्यानंतर राखीने 'राखी का स्वयंवर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून इलेश परूजनवालासोबत साखरपूडा करीत चाहत्यांना धक्का दिला होता. मात्र काही काळानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि राखीने एनआरआय रितेशसोबत लग्न केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र लग्नाच्या काही दिवसात त्यांचा घटस्फोट झाला. रितेशनंतर राखी फातिमा झाली आणि तिनेच आदिल दुर्रानीसोबत निकाह केल्याचा खुलासा केला होता. हे लग्नही टिकू शकलं नाही. राखी अनेकदा लग्न, अफेअर, घटस्फोट यांसारख्या विषयांमुळे चर्चेत राहिली आहे.
माध्यमांत आलेल्या वृत्तांनुसार, राखी ३७ कोटींची मालकीण आहे. ती चित्रपट, रिअॅलिटी शो व्यतिरिक्त जाहिरात, ब्रँड प्रमोशन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमावते.