
Marathi Actor Kiran Mane Post: मुलगी झाली हो या मालिकेतून घराघरात पोहोचलेले मराठी अभिनेते किरण माने यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेते किरण माने यांचे वडील दिनकरराव माने यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. 30 मार्च रोजी वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या मृत्यूनंतर किरण माने यांनी सोशल मीडियावर काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे किरण मानेंची पोस्ट?
"माझ्या मांडीवर शांतपणे जीव सोडला दादांनी! खूप धावपळ सुरू होती माझी. कोल्हापूरला इंद्रजीत सावंतांचा सत्कार झाला. नंतर चंद्रपूरला आंबेडकरी अस्मिता परिषदेसाठी गेलो. तिथून नागपूरला येऊन रात्री बाराच्या फ्लाईटनं पुणे एअरपोर्टवर उतरलो. दुसर्या दिवशीपासून नाशिकला शुटिंग सुरू होणार होतं. एक दिवसासाठी कशाला सातारला जायचं? शुटिंग संपल्यावर जाऊ सातारला, या विचारानं मी नाशिकला निघालोच होतो... पण बायकोच्या आग्रहाखातर अचानक निर्णय बदलला.
गुढी पाडव्याच्या दिवशी सातारला घरी तीनचार तास थांबून मग नाशिकला जाऊ असं ठरवलं आणि सातारला आलो. दादांच्या जवळ जाऊन बसलो. ते खुर्चीत शांत बसले होते. म्हटलं, "दादा मी नाशिकला चाललोय आजच लगेच." काही बोलले नाहीत. फक्त हातानं खुणावलं की 'शेजारी बस.' मी बसलो पण दादा काहीच बोलेनात. मला वाटलं त्यांना झोप आलीय. त्यांना बेडवर झोपवण्यासाठी मी आणि बायकोनं दोन्ही बाजूनं उचललं तर पायातला जीव गेल्यासारखे अलगद खाली बसले. माझ्या मांडीवर डोकं ठेवलं आणि शेवटचा श्वास घेतला.
ज्या शांतसरळ मार्गानं जगले, तसेच शांतपणे गेले. दादा, तुम्ही माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या असतील तर फक्त याच ठेवल्या की, ‘चांगला माणूस हो, पैसा कमव पण चुकीच्या मार्गाने कमावू नकोस, प्रामाणिकपणा सोडू नकोस, सत्य बोलायला घाबरू नकोस आणि गोरगरिबांना यथाशक्ती मदत कर. दादा, काल तुमचे जुने मित्र आले होते… ते म्हणाले, “तुझ्या वडीलांकडे सुखी माणसाचा सदरा होता. तो सदरा याच गुणांमुळे तुम्ही कमावला होतात दादा. आणि तोच तुम्ही वारशात ठेवला आहे. जगी ऐसा बाप व्हावा । ज्याचा वंश मुक्तीस जावा," असे किरण मानेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
( नक्की वाचा : Pune News: 'एक कोटींची जमीन 1 रुपये भाडे...', तरीही मंगेशकर हॉस्पिटलची पैशासाठी मग्रुरी का? )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world