Marathi Serial News: मनोरंजनाचा डबल धमाका, 2 नव्या मालिका 15 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Marathi Serial News: 15 सप्टेंबरपासून स्टार प्रवाह चॅनेलवर दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

जाहिरात
Read Time: 5 mins
"Marathi Serial News: दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार"

Marathi Serial News: स्टार प्रवाह मराठी वाहिनीवर नवनव्या मालिकांचा प्रवाह अखंड सुरू आहे. 15 सप्टेंबरपासून स्टार प्रवाहच्या परिवारामध्ये लपंडाव आणि नशिबवान या दोन नव्या मालिका दाखल होत आहेत. दोन्ही मालिकांच्या प्रोमोनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलंय. लपंडाव आणि नशिबवान या दोन नव्या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांना नवी गोष्ट आणि नव्या पात्रांना भेटण्याची संधी मिळणार आहे.नशिबवान मालिकेमध्ये गिरीजा नावाच्या मुलीची गोष्ट पाहायला मिळणार आहे, जिच्या आयुष्यात अनेक आव्हानं आहेत. आई-वडिलांचं प्रेम नाही, लहान वयातच आलेली घरची जबाबदारी आणि जगण्यासाठीचा संघर्ष असं खडतर आयुष्य गिरीजाच्या नशिबी आलंय. मात्र या कठीण प्रवासात ती नशिबवान आहे याचा उलगडा तिला होतो. गिरीजा नशीबवान का? आणि कशी ठरते? याची गुंफलेली सुंदर गोष्ट म्हणजे नशीबवान मालिका. कोठारे व्हिजनची निर्मिती असलेल्या या मालिकेत आदिनाथ कोठारे, सोनाली खरे, अजय पूरकर, नेहा नाईक अशी अनेक दिग्गज कलाकार मंडळी आहेत. 

आदिनाथ कोठारेसाठी ड्रीमरोल

आदिनाथ कोठारेसाठी रुद्रपताप ही भूमिका ड्रीमरोल आहे. या भूमिकेविषयी सांगताना आदिनाथ म्हणाला,"या मालिकेसाठी मी प्रचंड उत्सुक आहे. माझी पहिली दैनंदिन मालिका आहे. गेली अनेक वर्ष मालिका करण्याचा विचार सुरू होता. नशिबाने नशीबवान मालिकेच्या निमित्तानेच हा योग जुळून आला. टीव्ही हे फक्त माझंच नाही तर प्रत्येकाचच आवडतं माध्यम आहे. मालिकेच्या माध्यमातून तुम्ही घराघरात पोहोचता, प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग होता. नशीबवान मालिकेची गोष्ट अतिशय सुंदररित्या गुंफण्यात आलीय. रुद्रप्रताप या भूमिकेला देखील अनेक पदर आहेत जे हळू हळू उलगडतील."

मालिकेच्या विश्वातील नवा चेहरा- नेहा नाईक 

आयुष्यातली पहिली वहिली मालिका करताना मनात नेमकी काय भावना आहे हे सांगताना नेहा म्हणाली,"स्टार प्रवाहसारख्या महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत आयुष्यातील पहिली मालिका करायला मिळणं हे स्वप्नवत आहे. गिरीजा हे पात्र मी साकारत आहे. प्रचंड हुशार आणि हजरजबाबी असणारी गिरीजा सहसा कोणाला नडत नाही पण कुणी नडलं तर त्याला सोडत नाही. संकटातून मार्ग कसा काढायचा हे तिला लगेच सुचतं. तिचा जीव तिचे बाबा आणि भावामध्ये अडकला आहे. मालिकेत अनेक अनुभवी कलाकार आहेत. या सर्वांसोबत काम करायला मिळणं हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योग आहे".

Advertisement

(नक्की वाचा: Prasad Oak: प्रसाद ओकला बायकोने कानाखाली मारली, अभिनेता थरथरायला लागला, नेमकं काय घडलं?)

सहा वर्षांनंतर मालिका विश्वात कमबॅक

सुप्रसिद्ध अभिनेता अजय पूरकर या मालिकेत खलनायक म्हणजेच नागेश्वर घोरपडे ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या भूमिकेविषयी सांगताना अजय पूरकर म्हणाले,"जवळपास सहा वर्षांनंतर मालिकेत काम करतोय. याआधी मी इतका प्रभावशाली खलनायक साकारलेला नाही. नागेश्वर आपल्या पैश्याच्या जोरावर सामान्य माणसांना त्रास देतो. खून करायलाही मागेपुढे बघत नाही. देवीची पूजा करतो. पण राक्षसारखा लोकांचा छळ करतो. इतका क्रुर वागूनही तो कधीच कोणत्या केस मध्ये अडकत नाही. त्यामुळे नागेश्वर साकारताना अभिनेता म्हणून माझा कस लागणार आहे." 

सोनाली खरे पहिल्यांदाच साकारणार खलनायिका

उर्वशी या पात्राबद्दल सांगताना सोनाली खरे म्हणाल्या,"स्टार प्रवाह परिवाराचा मी भाग होतेच पुन्हा एकदा या परिवारात सामील होताना अतिशय आनंद होतोय. माझ्या करिअरची सुरुवातच मालिकेने झाली होती. त्यामुळे टीव्ही हे आवडतं माध्यम आहे. नशिबवान मालिकेत उर्वशी हे पात्र साकारणार आहे. पहिल्यांदाच खलनायिकेच्या रुपात दिसणार आहे. माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध पात्र आहे त्यामुळे काम करताना मजा येतेय."

Advertisement

(नक्की वाचा: Celebrity Couple News: बापरे मी किती कुरुप दिसतो, तू कसं काय लग्न केलंस माझ्याशी? दिग्दर्शकाचा अभिनेत्रीला सवाल Video Viral)

Advertisement

लपंडाव मालिकेमध्ये दिसणार जबरदस्त त्रिकुट 

फुल्ल फोकस यांची निर्मिती असलेल्या लपंडाव मालिकेतून नात्यांचा लपंडाव आणि त्या अनुषंगाने उलगडत जाणारी गोष्ट मालिकेचं वेगळेपण ठरेल. आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले, ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील प्रेक्षकांचा लाडका शशांक म्हणजेच अभिनेता चेतन वडनेरे आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री कृतिका देव हे त्रिकुट लपंडाव मालिकेतून भेटीला येईल. 

लपंडाव मालिकेतील सरकार 

रुपाली भोसलेने आई कुठे काय करते मालिकेत साकारलेल्या संजना या पात्राला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र आता संजना नाही तर सरकार बनून ती पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची छाप पाडणार आहे. या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना रुपाली म्हणाली,"तेजस्विनी कामत हे पात्र मी साकारत आहे जिला सगळे आदराने सरकार असं म्हणतात. प्रेम आणि नात्यांपेक्षा तिच्या लेखी पैशांना जास्त महत्त्व आहे. घरात आणि ऑफिसमध्येही तेजस्विनीचच राज्य आहे. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका नक्कीच वेगळी आणि आव्हानात्मक आहे."

(नक्की वाचा: Thappa Film: एकाच सिनेमात दिसणार 7 लई भारी मराठी कलाकार, प्रेक्षकांना पाहायला मिळणार रहस्यमय कथा?)

अभिनेता चेतन वडनेरे लपंडाव मालिकेतील कान्हा या पात्राविषयी सांगताना म्हणाला,"खूप दिवसांनंतर पुन्हा एकदा नवं पात्र साकारत आहे. प्रचंड उत्सुकता आहे. पुन्हा एकदा स्टार प्रवाह परिवारात सामील होताना आनंद होत आहे. बरेच प्रेक्षक मला ठिपक्यांच्या रांगोळी मालिकेतला शशांक उर्फ खडूस म्हणून ओळखतात. शशांक हे  पात्र हे खूप संयमित आणि शिस्तबद्ध होतं आणि त्याच्या अगदी विरुद्ध कान्हा हे पात्र आहे. प्ले विदिन अ प्ले अर्थात नाटकात एक नाटक या प्रकारातलं हे पात्र आहे जे साकारणं आव्हानात्मक आहेच पण त्यात मजाही तेवढीच येणार आहे. मी नट म्हणून खूप नशीबवान आहे की आधी साकारलेल्या पात्राच्या अगदी दुसऱ्या टोकाची भूमिका साकारण्याची संधी मला मिळते आहे आणि ती सुद्धा स्टार प्रवाह वाहिनीवरच ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे."

कृतिका देव पहिल्यांदा स्टार प्रवाहसोबत काम करतेय. सखी कामत असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. या भूमिकेविषयी सांगताना कृतिका म्हणाली, "स्टार प्रवाहसोबतचा माझा पहिला प्रोजेक्ट आहे. त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते की इतकं छान पात्र साकारण्याची संधी मला मिळाली. सखी कामत अतिशय श्रीमंत घरातली मुलगी आहे. सगळी सुखं तिच्या पायाशी आहेत मात्र आईच्या प्रेमासाठी ती आसुसलेली आहे. सखीच्या मनातली घालमेल नेमकी काय असेल हे साकारण्याचा माझा प्रयत्न असेल अशी भावना कृतिकाने व्यक्त केली."

लपंडाव मालिका दुपारी 2 वाजता आणि नशीबवान रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.