स्वरदा भोर, प्रतिनिधी
Met Gala 2026 : फॅशन जगतातील सर्वात मोठा इव्हेंट मानल्या जाणाऱ्या 'मेट गाला 2026'ची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमात जगभरातील सेलिब्रिटी सामील होतात, आणि हटके पोशाखांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. असे कपडे आपण आयुष्यात कधीच घालू शकणार नाही, असं तुम्हाला वाटत असेल. पण यात सहभागी होणारे सेलिब्रिटी आणि काही फॅशन ब्रॅण्ड्स चक्क पैसे देऊन या कार्यक्रमात सहभागी होत असतात. या सहभागी झालेल्यांना मेट गालाकडून दरवर्षी नव नवीन थीम दिली जाते. त्या थीमनुसार जगभरातले सेलिब्रिटी आणि फॅशन तज्ज्ञ किंवा फॅशनचे चाहते या सोहळ्यात सहभागी होतात. यावर्षीची थीम आहे 'Costume Art' आणि 'फॅशन इज आर्ट' असा ड्रेस कोड आहे. न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या या मेट गालामध्ये फॅशन आणि कला याची सांगड पाहायला मिळते.
करण जोहरच्या पोशाखाने वेधलं लक्ष
यंदाच्या मेट गालाच्या कार्यक्रमात परदेशातील अनेक दिग्गजासोबत भारतीय सेलिब्रिटीही लक्ष वेधून घेत आहेत. यामध्ये प्रमुख नाव घेता येईल ते निर्माता दिग्दर्शक करण जोहर याचं. करण पहिल्यादांच मेट गालामध्ये सहभागी झाला आणि सगळ्यांचीच मनं जिंकली. मनीष मल्होत्राने करणचं पोशाख डिझाइन केला असून राजा रवी वर्मांच्या चित्रांची कलाकृती यावर साकारल्याचं पाहायला मिळालं. करणच्या पेहरावाचा प्रत्येक भाग हा हॅण्डपेंटेड , हॅण्डवर्क केलेला होता. जवळपास ८० कलाकारांनी मिळून ही कलाकृती साकारली आहे. तब्बल ५६०० तास ही कलाकृती साकारण्यासाठी लागली. मेट गालामध्ये सहभागी होताना, राजा रवी वर्मा यांच्या कलाकृतीतून काहीतरी साकारण्याची संकल्पना स्वत: करणनेच सुचवल्याचं त्याने म्हटलं आहे. शिवाय ही कलाकृती साकारल्याबद्दल त्याचा मित्र आणि डिझाइनर मनीष मल्होत्राचे आभार ही त्याने मानले आहेत. एखाद्या पाश्चात्य कलेऐवजी आपली पारंपरिक कलाकृती जागतिक पातळीवर घेऊन जाण्याची करणची संकल्पना खरंच वाखणण्याजोगी असल्याची भावना चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
कोण होते राजा रवी वर्मा?
- राजा रवि वर्मा यांचा जन्म १८४८ रोजी केरळमधील कोईल तंपुरन येथील किलिमनूरमध्ये झाला.
- राजा रवी वर्मा आधुनिक भारतीय चित्रकलेचे जनक मानले जातात.
- ब्रिटिश गव्हर्नर जनरलनं त्यांना राजा ही पदवी दिली होती.
- भारताच्या त्रावणकोरच्या राजघराण्यातील चित्रकार म्हणून राजा रवी वर्मा यांची ओळख आहे.
- वर्मा यांनी भारतात ऑइल पेंटिंगला लोकप्रिय केलं.
- भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची रंगीत चित्रे काढली.
- राजा रवि वर्मा यांनी काढलेल्या चित्रांनंतरच हिंदू देवदेवतांची चित्र देशभरातील घराघरात पोहोचली.
- दुष्यंत व शकुंतला, नल व दमयंती या विषयावरील त्यांची चित्रं प्रसिद्ध आहेत.
- काही दिवस महाराष्ट्रात वास्तव्यास असल्याने मराठी संस्कृतीची छबी त्यांच्या अनेक चित्रांमधून पहायला मिळते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world