
हैद्राबादच्या हिटेक्स एग्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित 72 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत विजयाचा क्राऊन थायलँडची सुचाता चुआंगस्त्री हिने पटकावला आहे. मिस वर्ल्ड 2025 च्या स्पर्धेत 110 देशातील स्पर्धक सहभागी झाले होते. मात्र सुचाताने आपली प्रतीभा, आत्मविश्वास आणि सामाजिक योगदानाच्या माध्यमातून सर्वांना मागे टाकत हा क्राऊन मिळवला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुचाता चुआंगस्त्री हिला प्रेमाने ओपलं म्हटले जाते. सुचाताचा जन्म थायलँडच्या फुकेत शहरात 20 मार्च 2003 मध्ये झाला. ती थायसॅट विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंध विषयाची विद्यार्थिनी आहे. तिचं इंग्रजी, थाय आणि चिनी भाषेवर प्रभूत्व आहे. ओपल अनेक सामाजिक उपक्रम राबवते. त्यातील "ओपल फॉर हर" हा महिलांच्या स्तनांच्या आरोग्याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. वयाच्या 16 व्या वर्षी स्तनाच्या सिस्ट ऑपरेशनच्या अनुभवातून प्रेरित होऊन तिने हा उपक्रम सुरू केल्याची माहिती आहे.
गाऊनचंही विशेष महत्त्व...
सुचाता चुआंगस्त्री यांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत घातलेल्या गाऊनचंही खास वैशिष्ट्य आहे. ड्रेसच्या माध्यमातून ती खास संदेश घेऊन आली होती. हा गाऊनदेखील "ओपल फॉर हर" या तिच्या सामाजिक उपक्रमाशी जोडलेला आहे. हा गाऊन ओपल रत्नापासून प्रेरणा घेऊन डिझाइन करण्यात आला आहे. ओपल हे एक रत्न आहे, जे शक्ती, आशा आणि बदलाचं प्रतीक मानलं जातं. या गाऊनवरील चमकणारे पांढरे कापड आणि नाजूक फुलांचे भरतकाम हे आशादायी महिलांचं प्रतिनिधित्व करते. सुचाताच्या माध्यमातून पहिल्यांदाच थायलँडला मिस वर्ल्डचा पुरस्कार मिळाला आहे. या स्पर्धेत भारतातून नंदिनी गुप्तानेही चांगली कामगिरी केली. मात्र ती टॉप 8 मध्ये पोहोचू शकली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world