
Phule Movie Trailer : महात्मा ज्योतिबा फुले आणि पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित हिंदी सिनेमाचे ट्रेलर 24 मार्चला लाँच करण्यात आले आहे. 'फुले' असे या सिनेमाचे नाव आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित हा सिनेमा 11 एप्रिल 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी महात्मा फुले यांची जयंतीही आहे. "एक असा समाज असावा जेथे कोणी प्रधान नाही, सर्व समान असावेत", अशा दमदार डायलॉगने ट्रेलरची सुरुवात करण्यात आलीय. ट्रेलरमधील प्रत्येक डायलॉग ऐकताना आणि सीन पाहताना अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. ट्रेलर पाहून सिनेरसिक फुले सिनेमा पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'फुले' परिवर्तनाची कहाणी (Phule Hindi Movie)
महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी झुंज दिली. ब्रिटिशकालीन भारतात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, शेतकरी आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांची प्रेरणादायी कथा आता रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा केवळ ऐतिहासिक घटनांचा आढावा घेत नाही, तर सामाजिक समतेचा लढा नव्या पिढीसमोर आणणार आहे. महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांनी उभारलेल्या चळवळींचा आजही आपल्या समाजावर मोठा प्रभाव आहे.
(नक्की वाचा: सलमानने कटाप्पाची वडील सलीम यांच्याशी कशी ओळख करून दिली? वाचा भन्नाट किस्सा)
दिग्दर्शक आणि कलाकारांचं उत्तम सादरीकरण
राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत नारायण महादेवन यांनी फुले सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ऐतिहासिक विषयावर दमदार हातखंडा असलेल्या महादेवन यांनी यापूर्वी महत्त्वपूर्ण सिनेमे दिग्दर्शित केले आहेत.
(नक्की वाचा: 'हीरोइनला प्रोब्लेम नाहीय,तिच्या वडिलांना...' 31 वर्षे लहान रश्मिकासोबत काम करण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना सलमानचे सडेतोड उत्तर)
महात्मा फुले यांच्या भूमिकेत 'स्कॅम 1992' फेम अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) दिसणार असून सावित्रीबाई फुले यांची भूमिका अभिनेत्री पत्रलेखा (Patralekhaa) साकारत आहे. या दोघांनी या भूमिकांसाठी विशेष तयारी केली आहे, त्यांच्या दमदार अभिनयामुळे ही ऐतिहासिक पात्रे जिवंत होतील, असा विश्वास आहे. विनय पाठक हे देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
‘फुले' चित्रपटाचे निर्माते प्रणय चोक्शी, जगदीश पटेल, रितेश कुडेचा,अनुया चौहान कुडेचा, सुनील जैन आणि डॉ. राज खवारे असून, सहनिर्मितीची जबाबदारी क्रांती शानभाग, कलापी नागडा,रोहन गोडांबे, परीधी खंडेलवाल यांनी उचलली आहे. झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित यांच्या माध्यमातून ' फुले' हा हिंदी सिनेमा जगभरात 11 एप्रिल 2025 प्रदर्शित होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world