Entertainment News: 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाचा टीझर नुकतेच रिलीज करण्यात आला. महेश वामन मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा 31 ऑक्टोबर रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचे 'दुर्गे दुर्गट भारी' गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या गाण्यात दिसणारा महेश मांजरेकर यांचा लुक प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राइज ठरलंय. आतापर्यंत विविध सकारात्मक, नकारात्मक भूमिकांमध्ये दिसलेले मांजरेकर पहिल्यांदाच साधूच्या भूमिकेत झळकत आहेत. त्यामुळे त्यांच्या या नवीन अवताराकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक
महेश मांजरेकर यांचा 'दुर्गे दुर्गट भारी' गाण्यामध्ये साधू रूपातील अतिशय वेगळा लुक पाहायला मिळत आहे. डोक्यावर भगवा कपडा, गळाभोवती रुद्राक्षांच्या माळा, विस्कटलेले केस, लांब दाढी आणि हातात शंख या सर्वांमुळे त्यांची व्यक्तिरेखा प्रचंड उठून दिसते. त्यांच्या चेहऱ्यावरील तीव्रता, डोळ्यातील चमक आणि व्यक्त होणारा करारा भाव पाहुन प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
Photo Credit: Punha Shivaji Raje Bhosale Movie
वेगळीच अभिनययात्रा: महेश मांजरेकर
महेश मांजरेकर त्यांच्या या नव्या लुकविषयी म्हणाले,"आजवर मी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. पण साधूच्या व्यक्तिरेखेमध्ये मी कधीच दिसलो नव्हतो. हा लुक माझ्या नेहमीच्या लुकपेक्षा पूर्ण वेगळा आहे. यातली गूढता, ताकद आणि अध्यात्मिक छटा हे सर्व एकत्र येऊन या भूमिकेला एक आगळावेगळा आयाम मिळाला आहे. माझ्यासाठी ही एक नवी आणि वेगळीच अभिनययात्रा ठरणार आहे."
या भन्नाट लुकमुळे आणि प्रभावी गाण्यामुळे 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच प्रचंड चर्चेत आहे.
(नक्की वाचा: 'सोसाइटी में हम घाटी लोगों को नहीं रखते...मराठ्यांचा दणका दाखवला का कधी', पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाचा दमदार टीझर)
येत्या 31 ॲाक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध या चित्रपटाचे निर्माते असून यात सिद्धार्थ बोडके, विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री यांच्या प्रमुख भूमिका आहेत.