धर्मवीर-2 च्या कथानकातील राज ठाकरेंची एन्ट्री ठरणार वादाचं कारण? चित्रपटात नक्की काय दाखवलंय?

Dharmaveer 2 : पालघर साधू हत्याकांड ते राज ठाकरेंची एन्ट्री... यांसारख्या अनेक घटनांमुळे धर्मवीरचा दुसरा भाग वादात सापडण्याची शक्यता आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

धर्मवीर 2 सिनेमाचं (Dharamveer 2 Movie) स्पेशल स्क्रीनिंग 26 सप्टेंबर रोजी मोठ्या दिमाखात पार पडलं. सिनेमाच्या प्रीमिअरला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गैरहजर होते. धर्मवीर-2 च्या कथानकावरुन वाद होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. आनंद दिघे यांच्या मृत्यूपासून ते एकनाथ शिंदे यांच्या बंडापर्यंतचा पट उलगडवण्याचा प्रयत्न सिनेमातून करण्यात आला आहे. तर शिवसेनेचे खरे वारसदार राज ठाकरेच असल्याचं सिनेमात दाखवण्यात आलं आहे.

धर्मवीर 2 चित्रपटात काय आहे?
राज ठाकरे हेच शिवसेनेचे खरे वारसदार होते, असा एकनाथ शिंदे यांचा आनंद दिघे यांच्याशी संवाद आहे. आनंद दिघे हे कारसेवेसाठी अयोध्येला गेल्याचे दाखवण्यात आले आहे. आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. चित्रपटाची सुरुवातच पालघर साधू हत्याकांडामुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ झाल्याच्या प्रसंगाने झाली आहे. एकीकडे साधुंची हत्या आणि सरकारमध्ये असूनही काही न करता येण्याची हतबलता यात दाखवण्यात आली आहे. 2019 साली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याने आमदारांची होणारी कुचंबना, हिंदुत्वाचा होणारा अपमान, वर्षावर होणारी अवहेलना इत्यादी प्रसंग आहेत. 

नक्की वाचा - आघाडीत वादाची ठिणगी? राष्ट्रवादी विरुद्ध समाजवादी, दोघेही 'या' जागांवर अडले

एकनाथ शिंदे यांच्या जीवाला असणारा धोका यात दाखवण्यात आला आहे. यात एकनाथ शिंदेंसोबतच्या सर्वच आमदारांचे आणि सोबत असलेल्या महत्वाच्या नेत्यांचे पात्र आहेत. एकनाथ शिंदे यांना बंड का पुकारावे लागले, त्यांचा कशा प्रकारे अपमान विधानपरिषद निवडणुकीच्या दिवशी केला गेला हा प्रसंग आहे. एकूणच हिंदुत्व आणि शिवसेनेशी एकनाथ शिंदे यांचं कसं घट्ट नातं आहे हे दाखवण्यात आले आहे. 

त्यामुळे हा चित्रपट प्रोपोगंडा असल्याचा आरोप केला जात आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.