Rajpal Yadav Check Bounce Case: अभिनेता राजपाल यादव सध्या कायदेशीर कचाट्यात सापडला असून त्यांच्याशी संबंधित चेक बाऊन्स प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. राजपाल यादवला कर्ज देणारे व्यावसायिक माधव गोपाल अग्रवाल यांनी प्रथमच कॅमेऱ्यासमोर येत त्यांची बाजू मांडली आहे. मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक असलेल्या अग्रवाल यांनी 2010 मध्ये राजपाल यादवच्या 'अता पता लापता' या सिनेमासाठी 5 कोटी रुपये दिले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने राजपालला नुकताच अंतरिम जामीन मंजूर केला असला तरी, अग्रवाल यांनी लावलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत.
खासदारांच्या मध्यस्थीने झाली होती भेट
माधव गोपाल अग्रवाल यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांची आणि राजपाल यादवची भेट खासदार मिथिलेश कुमार कठेरिया यांच्या माध्यमातून झाली होती. त्यावेळी राजपालने त्याचा सिनेमा पूर्ण होत आल्याचे सांगितले होते आणि जर त्वरित आर्थिक मदत मिळाली नाही, तर सर्व काही उद्ध्वस्त होईल अशी भीती घातली होती.
सुरुवातीला अग्रवाल यांनी पैसे देण्यास नकार दिला होता, मात्र राजपालची पत्नी राधा यादव हिने वारंवार मेसेज करून आणि भावनिक आवाहन केल्यामुळे ते पैसे देण्यास तयार झाले. ही मदत केवळ भावुक होऊन केली होती, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
( नक्की वाचा : Dharashiv News : अखेरचा निरोप घेण्यापूर्वी लिहून ठेवलं सगळं; मुख्याध्यापकाच्या पत्राने खळबळ, नेमकं काय घडलं? )
गुंतवणुकीचा दावा फेटाळला
अग्रवाल यांनी या व्यवहाराबद्दल महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, हे केवळ एक कर्ज होते, ती कोणतीही गुंतवणूक नव्हती. त्यांच्यातील करारात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की, सिनेमाचे यश, सेन्सॉर सर्टिफिकेट किंवा इतर कोणत्याही बाह्य अडचणींचा या पैशांवर परिणाम होणार नाही.
राजपाल यादवला ठरलेली रक्कम ठरलेल्या वेळेत परत करायची होती आणि त्यासाठी त्याने वैयक्तिक हमी देखील दिली होती.गुंतवणुकीमध्ये कधीही वैयक्तिक गॅरंटी किंवा चेक दिले जात नाहीत, त्यामुळे हा व्यवहार निव्वळ कर्जाचा होता असा दावा अग्रवाल यांनी केला आहे.
( नक्की वाचा : Beed News: बीडमध्ये बिल्डरला चक्क महिला बाऊन्सर्सचा पहारा! वाचा कुणाच्या दहशतीमधून घेतला निर्णय? )
प्रत्येक वेळी तोडले आश्वासन
सिनेमाचे काम पुढे सरकत असताना आणि पैसे परत मिळण्याची वेळ आली तेव्हा राजपालने पैसे नसल्याचे कारण दिले. यामुळे तीन वेळा पूरक करार करण्यात आले आणि नवे चेक घेण्यात आले.अमिताभ बच्चन यांनी या सिनेमाचे संगीत लाँच केले, तेव्हा अग्रवाल यांना त्याबद्दल माहिती मिळाली.
कराराप्रमाणे पैसे मिळत नसल्याने त्यांनी कोर्टात धाव घेऊन सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणली होती. मात्र, राजपालने विनंती केल्यानंतर आणि सेटलमेंटचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी ती बंदी उठवली. दुर्दैवाने तो सिनेमा फ्लॉप ठरला आणि अग्रवाल यांचे पैसे अडकले.
घराबाहेर रडूनही पाझर फुटला नाही
अग्रवाल यांनी अत्यंत भावुक होऊन सांगितले की, त्यांनी स्वतः इतरांकडून उधार घेऊन राजपालला पैसे दिले होते. आपल्या हक्काच्या पैशांसाठी ते राजपालच्या घरी जाऊन लहान मुलांसारखे रडले आणि गयावया केली. राजपाल सांगेल त्या तारखेला नवा करार करण्याची त्यांची तयारी होती, पण प्रत्येक वेळी दिलेला चेक बाउंस झाला आणि दिलेले शब्द पाळले गेले नाहीत.
2013 मध्ये हे प्रकरण कोर्टात गेले आणि तिथे 10.40 कोटी रुपयांवर तडजोड झाली. मात्र, राजपालने जमा केलेले ते चेक सुद्धा बाउंस झाले, ज्यामुळे हे प्रकरण अधिक चिघळले.
पैशांसाठी कायद्याचा लढा कायम
राजपाल यादवला जेलमध्ये पाठवून आपली प्रतिष्ठा वाढणार नाही, असे अग्रवाल यांचे म्हणणे आहे. एक व्यावसायिक म्हणून त्यांना केवळ त्यांचे पैसे परत हवे आहेत. राजपालच्या जेलवारीने त्यांचे नुकसान भरून येणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असून अग्रवाल आता कायद्याच्या माध्यमातून त्यांच्या हक्काच्या पैशांची वाट पाहत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world