Rapper Badshah in Legal Trouble: प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह आपल्या एका नवीन गाण्यामुळे कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. 'न्यू लाँग टटीरी' या गाण्यातील वादग्रस्त शब्द आणि व्हिडीओमधील चित्रणामुळे हरियाणा पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. तो देश सोडून पळून जाऊ नये, यासाठी पोलीस लूक आऊट सर्कुलर जारी करण्याच्या प्रक्रियेत आहेत. या प्रकरणी बादशाहला अटक देखील होऊ शकते.
पोलीस कारवाईचं कारण काय?
पंचकूला येथील सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि 'स्त्री अश्लील प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायदा' अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये शालेय गणवेशातील अल्पवयीन मुली दप्तर फेकून देताना आणि अभ्यासापासून दूर पळताना दाखवण्यात आल्या आहेत. गाण्यात महिला आणि मुलींबद्दल अत्यंत अशोभनीय आणि अश्लील शब्दांचा वापर केल्याचा आरोप आहे. तसेच 'बादशाला' सारख्या शब्दांतून शैक्षणिक वातावरणाचा अवमान केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
(नक्की वाचा- रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजपची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी)
सरकारी बसच्या वापराबाबत चौकशी
या गाण्याच्या शूटिंगसाठी वापरण्यात आलेल्या सरकारी यंत्रणेचीही आता चौकशी होत आहे. गाण्यात जींद डेपोची हरियाणा रोडवेज बस दिसली आहे. यासाठी परिवहन विभागाची परवानगी घेतली होती का, याची तपासणी सुरू आहे. शूटिंगसाठी एका सरकारी शाळेचा वापर करण्यात आला आहे. जर कोणत्याही अधिकाऱ्याची परवानगी न घेता हे चित्रीकरण झाले असेल, तर संबंधितांवर कलम 120-बी अंतर्गत कारवाई केली जाईल.
सोशल मीडियावरून गाणे हटवले
पंचकूला पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत बादशाहच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरून हे गाणे हटवले आहे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतर म्युझिक प्लॅटफॉर्मवरूनही हे गाणे हटवण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या गाण्यावर रिल्स किंवा व्हिडीओ बनवून शेअर करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
(नक्की वाचा- Shivneri Bus: मुंबई-पुण्यानंतर राज्यभर धावणार 'शिवनेरी'! 'या' 8 नवीन मार्गांवर सुरू होणार सेवा)
पोलिसांचा शोध सुरू
बादशाहला तातडीने पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांची पथके वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा शोध घेत आहेत. जर त्याने सहकार्य केले नाही, तर त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world