श्रद्धा कपूरच्या आगामी इठा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. चित्रपटाचा टीजर समोर आल्यानंतर श्रद्धाच्या ट्रान्सफॉर्मेशनचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. श्रद्धाने लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारली आहे. आता इठा या चित्रपटाच्या शीर्षकावरुन वाद निर्माण झाला आहे. विठाबाई नारायणगावर या महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोक कलाकार. त्या लावणी आणि तमाशातील दिग्गज कलाकारांपैकी एक होत्या, त्यांना राष्ट्रपती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. ग्रामीण भागात त्यांना प्रेमाने इठा किंवा विठा म्हटलं जात होतं. मात्र आता या चित्रपटाच्या नावावरुन वाद उपस्थित केले जात आहे.
NCP कडून नाव बदलण्याचा सल्ला...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्मिती संस्था मॅडॉक फिल्म्स यांना पत्र लिहून चित्रपटाचं शीर्षक बदलण्याची विनंती केली आहे. विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे की, विठाबाई नारायणगावकर या महाराष्ट्राची सांस्कृतिक संपत्ती आहेत. चित्रपटाच्या शीर्षकात त्यांच्या नावाचा समावेश केला पाहिजे.
बाबासाहेब पाटील NDTV शी बोलताना म्हणाले, ग्रामीण भागात त्यांना इठा म्हणून ओळखलं जातं. मात्र त्यांचं खरं आणि मान्यता प्राप्त नाव विठाबाई नारायणगावकर आहे. हा चित्रपट मोठ्या स्केलवर तपास होत आहे. यामध्ये श्रद्धा कपूर आणि लक्ष्मण उत्तेकर यांचा समावेश आहे. देश आणि जगभरातील लोक हा चित्रपट पाहतील, त्यामुळे तिच्या योग्य नावाचा वापर करणं आवश्यक आहे. बाबासाहेब पाटील पुढे म्हणाले, विठाबाई केवळ एक नाव नाही तर महाराष्ट्रात लावणी-तमाशा परंपरेचं प्रतीक आहे. चित्रपटाचं नाव बदलून विठा किंवा विठाबाई ठेवलं तर कलाकाराला योग्य सन्माम मिळेल.
विठाबाईंच्या कुटुंबाची भूमिका काय आहे?
विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळाचे मालक आणि विठाबाईंचे नातू मोहित नारायणगावकर यांनीही स्पष्ट केलं की, त्यांच्या कुटुंबाचा चित्रपटाला विरोध नाही. ते चित्रपटाचे स्वागत करतात. पण त्यांची एकच विनंती आहे की, चित्रपटाच्या शीर्षकात त्यांच्या आजीचं नाव अचूक असावं. मोहितने सांगितलं की, जेव्हा या प्रकल्पाची घोषणा झाली, तेव्हा लक्ष्मण उतेकर यांनी त्याला फोन केला होता. ते म्हणाले की, या चित्रपटामुळे लावणी आणि तमाशाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळेल. मात्र, त्यानंतर कुटुंबासोबत कोणतीही बैठक झाली नाही. कुटुंबाचे म्हणणं आहे की, विठाबाई त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत 'विठाबाई नारायणगावकर' म्हणूनच ओळखल्या जात होत्या. टीझरमधील श्रद्धाच्या लूकवर ते खूश आहेत.