महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. महाराष्ट्रात नंदूरबार, बीड, रावेर, पुणे, शिरूर, नाशिक, शिर्डी, जळगाव, जालना, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघात मतदान पार पडत आहे. यंदाच्या टप्प्यात पुण्यात मतदान पार पडत आहे. विविध सिनेकलाकार सकाळपासून मतदानाचा हक्क बजावत असून लोकांना मतदान करण्याचं आवाहन करीत आहेत.
दरम्यान गायिका सावनी रवींद्र यांनी एक खंत व्यक्त केली आहे. मतदानाचा हक्क बजावता आला नसल्याने सावनीने एक पोस्ट शेअर करीत आपली भावना व्यक्त केली आहे. मतदार यादीत नाव नसल्यामुळे सावनीला मत देता आलं नाही. म्हणून तिने नाराजी व्यक्त केली. कुटुंबातील सर्वांचं नाव होतं, मात्र सावनीचं नाव नसल्याने मतदान केंद्रावर जाऊनही तिला मतदान न करता माघारी परतावं लागलं. गेली अनेक वर्षे सावनी याच मतदान केंद्रावर मतदान करते, मात्र यंदा तिचं नाव नसल्याने तिने नाराजी व्यक्त केली.
नक्की वाचा - देशभरात दिग्गजांसह सिनेकलाकारांचीही मतदानाला हजेरी, तुम्ही मतदान केलं का?
तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, गेले अनेक दिवस सर्व ऑनलाइन पोर्टलवर मतदारांच्या यादीत नाव शोधण्याचा प्रयत्न करूनही नाव सापडले नाही. शेवटी आज मतदान केंद्रावर नाव शोधण्याचा प्रयत्न केला. तरीही नाव सापडले नाही. आमच्या घरातील बाकी सर्व सदस्यांची नावं आहेत पण माझे नाही. याबद्दल मतदार अधिकाऱ्याची त्या ठिकाणी जाऊन भेट घेऊन AED पर्यायाने वोट करू शकते का याबद्दल विचारणा केली, त्यांनी नकार दिल्याने मत न देताच परत यावे लागले.