- दिल्ली उच्च न्यायालयाने संजय कपूर यांच्या मालमत्तेवरील वादात करिश्मा कपूरच्या मुलांना दिलासा दिला
- प्रिया कपूर यांना संजय कपूर यांच्या मालमत्ता विक्रीस, शेअर्स हस्तांतरित करण्यास बंदी
- कपूर यांचे मृत्यूपत्र बनावट असल्याच्या संशयाची चौकशी होईपर्यंत मालमत्तेवर जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचा आदेश
Sunjay Kapur Property Dispute Case: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरची मुले समायरा आणि कियान यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांचे वडील आणि दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या मालमत्तेवरून सुरू असलेल्या वादात न्यायालयाने अंतरीम स्थगिती आदेश दिला आहे. यामुळे संजय कपूर यांची सध्याची पत्नी प्रिया कपूर यांना त्यांची मालमत्ता विकता येणार नाही. तसेच न्यायालयाने त्यांचे बँक खातेही गोठवले आहेत. या निर्णयामुळे करिश्मा कपूरच्या दोन्ही मुलांना न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे.
संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेचा वाद निर्माण झाला होता. करिश्मा कपूरच्या मुलांनी या संपत्ती वाटपाच्या सत्यतेवर संशय व्यक्त करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. जर संजय कपूर यांचे मृत्यूपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाले, तर मुलांवर अन्याय होईल, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. जोपर्यंत मृत्यूपत्रातील संशयाचे निरसन होत नाही, तोपर्यंत मालमत्तेचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे न्यायमूर्ती ज्योती सिंग यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे करिश्मा कपूरच्या मुलांचा मोठा विजय झाल्याचं बोललं जात आहे.
न्यायालयाने प्रिया कपूर यांना भारतीय कंपन्यांमधील शेअर्स किंवा इक्विटी विकण्यास, हस्तांतरित करण्यास किंवा गहाण ठेवण्यास मनाई केली आहे. याशिवाय दोन भारतीय बँकांमधील 3 बँक खात्यांमधून पैसे काढण्यावर बंदी घातली आहे. संजय कपूर यांची परदेशी बँक खाती आणि क्रिप्टोकरन्सी व्यवहारांवरही बंदी लावली आहे. खासगी वस्तू, कलाकृती (Artwork) आणि भविष्य निर्वाह निधीची (PF) रक्कम काढण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रिया यांच्यासाठी मोठा दणका समजला जात आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की, मुलांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि मृत्यूपत्राची सत्यता सिद्ध करण्याची जबाबदारी आता प्रिया कपूर यांच्यावर आहे. तोपर्यंत संजय कपूर यांच्या सर्व मालमत्तेवर 'जैसे थे' (Status Quo) स्थिती कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने व्यावसायिक संजय कपूर यांच्या वारसा हक्काच्या वादात महत्त्वाचा हस्तक्षेप केला आहे. करिश्मा कपूरची मुले समायरा आणि कियान यांनी संजय कपूर यांच्या वसीयतीवर घेतलेला संशय प्रथमदर्शनी ग्राह्य धरत न्यायालयाने अंतरीम मज्जाव आदेश लागू केला आहे. 'मालमत्तेची विल्हेवाट लावण्यापेक्षा तिचे जतन करणे न्याय्य ठरेल', असे निरीक्षण न्यायमूर्ती ज्योती सिंग यांनी नोंदवले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world