- तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांचा शेवटचा चित्रपट जना नायक 23 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे
- ७ महिन्यांच्या विलंबानंतर रिलीज होणाऱ्या या चित्रपटासाठी तिकीट खिडकीवर प्रेक्षकांची मोठी गर्दी
- बंगळुरू, हैदराबाद, मुंबई, दिल्ली आणि केरळ येथे चित्रपटाच्या तिकिटांची ॲडव्हान्स बुकिंग सुरू
तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांची लोकप्रियत अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा प्रत्यय सध्या येत आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांच्या 'जना नायगन' या चित्रपटाची चर्चा सुरू झाली होती. हा त्यांचा शेवटचा चित्रपट असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे त्याची प्रतिक्षा त्याच्या चाहत्यांना होती. आता ही प्रतिक्षा संपली आहे. हा चित्रपट अखेर 23 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 7 महिन्यांच्या विलंबांनंतर रिलीज होणाऱ्या या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. विजयचा हा शेवटचा चित्रपट आहे. त्यामुळे तिकीट खिडकीवर अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळत आहे.
भारतात काही मोजक्याच ठिकाणी ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. काही मिनिटांतच या चित्रपटाचे शो हाऊसफुल झाले आहेत. त्याच्या चित्रपटाच्या तिकीटाचे दरही गगनाला भिडले आहे. सध्या 2500 रुपयांवर एक तिकीट मिळत आहे. बंगळुरू, हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीसह केरळमध्ये ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. बहुतांश ठिकाणी तमिळ व्हर्जनसाठी तिकिटांचे दर 100 ते 800 रुपयांच्या दरम्यान आहेत. मात्र, बंगळुरूमध्ये निर्माते के. व्यंकटा नारायण यांच्या प्रभावामुळे तिकिटांचे दर 1000 रुपयांच्या पुढे गेले आहेत.
सिनेपोलिस नेक्सस शांतिनिकेतन येथे रिक्लायनर सीटची किंमत सर्वाधिक म्हणजे 2500 रुपये ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये तिकिटांचे दर नियंत्रित ठेवण्यात आले आहेत. ते 54 रुपये ते 190 रुपयांच्या दरम्यान आहेत. तामिळनाडूत पूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटना पाहता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, चेन्नईच्या कमला सिनेमाजने अवघ्या काही मिनिटांत 10 हजार तिकिटांची विक्री केली आहे. परदेशातही युकेमधील वितरक अहिंसा एंटरटेन्मेंटने घोषणा झाल्यापासून अवघ्या एका तासात हजारो तिकिटे विकली गेल्याचा दावा केला आहे.
विजय यांच्या 'जन नायक'ची क्रेझ पाहायला मिळत आहे. विजय यांचा मोठा चाहता वर्ग तामिळनाडूमध्ये आहे. त्यांच्या पाठिंब्यानेच विजय थेट मुख्यमंत्रीपदा पर्यंत पोहचू शकले आहेत. राजकारणात येण्या आधी त्यांनी जन नायक हा आपला शेवटचा चित्रपट असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता विजय हे राजकारणात सक्रीय झाले आहेत. त्यामुळे आपल्या या लाडक्या अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची खऱ्या अर्थाने झुंबड उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world