
Waves Summit 2025 : भारत आणि चीनमधील प्रेक्षकांच्या भावना सारख्याच आहेत. भारतीय प्रेक्षक ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात तसेच चीनमधील प्रेक्षकही देतात, असं वक्तव्य चित्रपट अभिनेता आमिर खाननं केलं आहे.मुंबईच्या BKC परिसरात सुरु असलेल्या पहिल्या-वहिल्या Waves शिखर परिषदेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. दुसऱ्या दिवशीही या शिखर परिषदेमध्ये कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळणार आहे. NDTV समुहाचे संपादक संजय पुगलिया यांनी चित्रपट अभिनेता आमिर खान, फिल्ममेकर पिटर हो सून चान, दिग्दर्शक स्टेनली टाँग आणि निर्माते प्रसाद शेट्टी यांच्याशी संवाद साधत साधला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यामध्ये बोलताना आमिर खान याने भारत आणि चीनमधील प्रेक्षकांच्या भावना सारख्याच आहेत, असं वक्तव्य केलं. मला गेल्या 10 वर्षांत चीनला जाण्याची अनेकदा संधी मिळाली. भारत आणि चीनमधल्या प्रेक्षकांच्या भावना या सारख्याच आहेत, असे मला वाटते, असं आमिर म्हणाला.
आमिर खाननं यावेळी 'दंगल' या त्याच्या सिनेमाचं उदाहरण सांगितलं. 'दंगल' चं उदाहरण घेऊया, भारतीय प्रेक्षक ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात तसेच चीनमधील प्रेक्षकही देतात. चीन आणि भारतामध्ये क्रिएटीव्ह लोकं आहेत. चीनमध्ये खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. भारत आणि चीनला मोठा इतिहास, परंपरा लाभली आहे, असं आमिरनं स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : Waves Summit 2025: '...तर चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो', वेव्हज परिषदेत कलाकारांनी व्यक्त केल्या भावना )
भारत आणि चीनमध्ये बरीच साम्ये आहेत. दोन्ही देशांमधील संस्कृतीत फार फरक नाही. चीनने जगभरातील चित्रपटांना आपलेसे केले आहे. कथेतील भाव जसा भारतामध्ये प्रभावी ठरतो तसाच तो चीनमध्येही ठरतो, असं निर्माते प्रसाद शेट्टी यावेळी म्हणाले.
'पीके' पाहिल्यानंतर मला रडू आलं होतं. माझा एक चिनी सहाय्यक होतो, मी हसताना तोही हसत होता, तो सबटायटल बघून हसत होता. मनापासून आपण चित्रपट बनवला तर तो सगळ्यांना भावतो, असं शेट्टी यांनी यावेळी सांगितलं.
भारतीय चित्रपटाकडून बरंच शिकलो
मी भारतीय चित्रपटाकडून बरंच शिकलो अशी भावना चीनमधील दिग्दर्शक स्टेनली टाँग यांनी व्यक्त केली. मी लहान असताना ताज महालचे चित्र काढायचो. बुद्धीजमचा मी अभ्यास केला आहे. 20 वर्षापूर्वी जॅकी चॅनसोबत चित्रपट पाहात असताना कलरीपय्यटूचाही वापर केला होता. चीनमधील अनेकांना त्याबद्दल माहिती नाही.
भारतीय चित्रपटाकडून मी बरंच काही शिकलो आहे. या चित्रपटांमध्ये कौटुंबिक मूल्ये, मैत्री, प्रेम आणि सामाजिक विषय असतात. हे सगळे विषय चीनमधील प्रेक्षकांसाठीही प्रभावी ठरू शकतात. दोन्ही देशांना एकत्र येण्यासाठी एक चांगली संधी आहे. मी भारतात येत असताना प्रसाद आणि आमिर यांच्याशी एकत्रितपणे काही करू शकतो का याबाबत बोललो होतो. चिनी आणि भारतीय चित्रपटांचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. असे असेल तर एकत्र येऊन आपण काम का करू नये ? लेखक, दिग्दर्शक, कलाकार यांच्यात देवाणघेवाण करून चांगले चित्रपट का बनवले जाऊ शकत नाही? असा सवाल त्यांनी विचारला.
शशी कपूरमुळे भारतीय चित्रपटांची ओळख
शशी कपूर यांच्यामुळे मला भारतीय चित्रपटांची ओळख झाली, अशी माहिती फिल्ममेकर पिटर हो सून चाननं दिली. मी थायलँडमध्ये वाढलो, माझे बरेच मित्र भारतीय होते. त्यांच्यासोबत आलू पराठा खात मी मोठा झालो आहे. 2005 मध्ये एका संगीताच्या कार्यक्रमाचे काम आले होते, त्यासाठी मी मुंबईत फराह खानला भेटलो होतो तिने मला मृत्यदिग्दर्शनासाठी सहकार्य केले होते, असं चान यांनी सांगितलं.
मला सहकाऱ्याने 3 इडियट बघायला लावला होता. पहिली काही मिनिटे मला चित्रपट कळालाच नव्हता कारण तो आमच्या धाटणीचा नव्हता. मात्र नंतर मी तो चित्रपट 5 वेळा बघितला. कबीर खान हा माझा मित्र झाला तो उत्कृष्टपणे कथा सांगतो, असंही चाननं यावेळी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world