Adani Group Latest News : अदाणी समूहासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गुजरातच्या मुंद्रा बंदराद्वारे इराणी एलपीजी (LPG) आयात केल्याच्या आणि अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांचे कथित उल्लंघन केल्याच्या प्रकरणात अदाणी समूहाने अमेरिकन ट्रेझरी डिपार्टमेंटच्या 'ऑफिस ऑफ फॉरेन अॅसेट कंट्रोल' (OFAC) सोबत यशस्वी तडजोड केली आहे. या प्रकरणाच्या सेटलमेंटसाठी अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) 275 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा दंड भरण्यास तयार झाली असून, यामुळे हा कायदेशीर वाद आता पूर्णपणे बंद झाला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अदाणी समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या 'अदानी एंटरप्रायझेस'ने नोव्हेंबर 2023 ते जून 2025 या काळात दुबईतील एका व्यापाऱ्याकडून एलपीजीची खरेदी केली होती.या पुरवठादाराने ही गॅस ओमान आणि इराकची असल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात ती अवैध इराणी एलपीजी पुरवठ्याचा भाग असल्याचे नंतर समोर आले.जून 2025 मध्ये हे वृत्त सार्वजनिक झाल्यानंतर अदाणी समूहाने तात्काळ आयात थांबवून अमेरिकेत कायदेशीर सल्लागार नियुक्त केले. स्वतःहून या प्रकरणाची माहिती 'OFAC'ला दिली.
तपासात पूर्ण सहकार्य आणि दंडातील सवलत
नियमांनुसार अदाणी समूहाला कमाल 384 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा दंड होऊ शकला असता. परंतु, अदाणी समूहाने तपासात केलेले व्यापक सहकार्य, कागदपत्रांची उपलब्धता आणि स्वतःहून दिलेली माहिती (Self-Reporting) या सकारात्मक बाबींमुळे 'OFAC'ने दंडाची रक्कम 275 दशलक्ष डॉलर्सपर्यंत कमी केली. कंपनीने स्पष्ट केले आहे की, हा करार कोणत्याही प्रकारे गुन्हा मान्य केल्याचे प्रमाण नाही, तर भविष्यातील कायदेशीर कटकटी टाळण्यासाठी केलेली तडजोड आहे.
एकाच आठवड्यात दुसरा मोठा दिलासा
गेल्याच आठवड्यात गौतम अदाणी आणि त्यांच्या पुतण्यावर असलेले लाचखोरीचे आरोप मिटवण्यासाठी त्यांनी अमेरिकेच्या 'SEC'ला 18 दशलक्ष डॉलर्स देण्याचे मान्य केले होते. त्यानंतर आता आठवडाभरातच हा दुसरा मोठा वाद मिटला आहे. या सेटलमेंटमुळे अदाणी समूहावरील मोठे कायदेशीर संकट दूर झाले असून, त्यांच्या जागतिक विस्ताराचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)