platinum News : सोन्या चांदीनं यंदा लाखाचा टप्पा पार केला, आता आणखी एक मौल्यवान धातू भाव खाऊ लागलाय. जागतिक बाजारात गुरुवारी प्लॅटिनमचे दर लाखांच्या घरात पोहोचले. गेल्या १८ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर प्लॅटिनम पोहोचलंय. गुरुवारी प्लॅटिनमचे दर प्रती आऊंस 1,975 डॉलर झालेत. काय घडतंय जागतिक बाजारात? सोनं चांदीचे दर वाढत असतानाच प्लॅटिनमच्या दरात इतकी वाढ का झाली, गुंतवणूकदारांसाठी ही संधी आहे की धोक्याची चिन्हं, गुंतवणूकदारांनी काय काळजी घ्यायला हवी. पाहूया.... `
सोन्या-चांदीचे दर विक्रमी पातळीवर पोहोचल्याने प्लॅटिनमही गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहे. जागतिक बाजारात गुरुवारी प्लॅटिनमचे दर 18 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर, 1,975 डॉलर प्रति औंस (1,78,227 रुपये प्रति 28.35 ग्रॅम) वर पोहोचले. गुंतवणूकदार कमकुवत होत असलेल्या चलनातून होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून बचाव (हेजिंग) करण्यासाठी प्लॅटिनममध्ये गुंतवणूक करत आहेत. २०२५ मध्ये आतापर्यंत प्लॅटिनमची किंमत 121% वाढली आहे. ही वाढ सोन्यातील 74% वाढीपेक्षा जास्त आहे, तर चांदीतील 132% वाढीच्या जवळपास आहे. सोने-चांदी गरजेपेक्षा जास्त महाग झाल्याने स्वस्त पर्याय म्हणून प्लॅटिनमकडे पाहिलं जातं. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, भारतात प्लॅटिनमची सरासरी किंमत 61,513 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. 2024 च्या अखेरीस ती 27,560 रुपये आणि 2020 च्या अखेरीस 24,910 रुपये होती.
२०२५ मध्ये आतापर्यंत प्लॅटिनमची किंमत 121 टक्क्यांनी वाढली आहे. ही वाढ सोन्यातील 74% वाढीपेक्षा जास्त आहे, तर चांदीतील 132% वाढीच्या जवळपास आहे.
प्लॅटिनमची वैशिष्ट्य काय आणि कुठे कुठे प्लॅटिनमचा वापर होतो?
प्लॅटिनम हा एक दुर्मिळ, चांदीसारखा-पांढरा, चमकदार आणि मौल्यवान धातू आहे. जो रासायनिकदृष्ट्या अत्यंत स्थिर असून गंज-प्रतिरोधक उच्च तापमानातही त्याची गुणवत्ता टिकते. सोने आणि चांदीपेक्षाही दुर्मीळ.
उच्च घनतेचा धातू आहे.
प्लॅटिनमचे प्रमुख उपयोग
- वाहनांमधील हानिकारक वायूंचे रूपांतर कमी विषारी वायूमध्ये करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून वापर.
- टिकाऊपणा, चमक आणि गंज-प्रतिरोधक असल्यामुळे उच्च दर्जाचे दागिने बनवण्यासाठी.
- कर्करोगाच्या उपचारांसाठी औषधे, केमोथेरपीच्या औषधांमध्ये वापर
- पेसमेकरसारख्या उपकरणांमध्ये वापर
- हार्ड डिस्क, फायबर ऑप्टिक्स, इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट्स आणि स्पार्क प्लगमध्ये.
- नायट्रिक ॲसिड, सिलिकॉन आणि पॉलिस्टर तयार करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून.
- मौल्यवान धातू असल्याने गुंतवणुकीसाठीही वापरला जातो.
- काच निर्मिती, पेट्रोलियम शुद्धीकरण आणि इंधन पेशींमध्ये
प्लॅटिनम दुर्मिळ आणि महाग असल्यामुळे, जिथे त्याला पर्याय नाही अशा ठिकाणी किंवा उच्च प्रतिष्ठेसाठी वापरला जातो. तर त्याच्या विविध वैशिष्ट्यांमुळे आणि वापरामुळे त्याच्यातील गुंतवणुकीतही वाढ होते आणि सध्या त्यानं उच्चांकी दर गाठलेला असल्यानं गुंतवणूक दरांसाठी तज्ज्ञांनी मोलाचा सल्ला दिला आहे. आता ग्रीन एनर्जी आणि हायड्रोजन अर्थव्यवस्थेमध्ये त्याच्या वाढत्या वापरामुळे नवीन मागणी निर्माण झाली आहे.
औद्योगिक मागणी वाढल्याने त्याच्या किमतींना सतत आधार मिळत आहे.
गुंतवणुकीत वाढ, उत्पादनात घट
जगभरात प्लॅटिनमचा 70-75% पुरवठा दक्षिण आफ्रिकेतून होतो, तिथे अनेक खाणींमध्ये उत्पादन घटले आहे. रशिया आणि युक्रेनमधील भू-राजकीय तणावामुळे पुरवठा साखळीवरही परिणाम झाला आहे. वर्ल्ड प्लॅटिनम इन्व्हेस्टमेंट कौन्सिलने यावर्षी 69,200 औंस पुरवठा कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मार्च 2026 मध्ये 12-15% पर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरीही यंदा गुंतवणुकीच्या बाबतीत यंदाप्लॅटिनमने सोन्याला मागे टाकले आहे. अमेरिकेतील आर्थिक आणि धोरणात्मक अनिश्चिततेमुळे लोक गुंतवणुकीचे नवीन मार्ग शोधत आहेत. प्लॅटिनम डॉलर-सोन्याच्या तुलनेत एक चांगला पर्याय मानला जात आहे. सोन्याच्या तुलनेत त्याचे प्रमाण सुधारत आहे. यामुळे दीर्घकाळात वाढ होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
