छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्पासाठी टोयोटा किर्लोस्करसमवेत सामंजस्य करार आज (बुधवार 31 जुलै) झाला. हा प्रकल्प राज्यातील मोटार निर्मिती उद्योगात क्रांती आणणारा आहे, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केलं. सह्याद्री अतिथिगृह येथे राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्स निर्मितीच्या ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
20 हजार कोटींची गुंतवणूक
छत्रपती संभाजीनगर येथे या प्रकल्पातून इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्सचे उत्पादन होणार आहे. यासाठी 20 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असून सुमारे 8 हजार थेट आणि अप्रत्यक्ष 8 हजार अशी 16 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पातून वर्षाला 4 लाख कारची निर्मिती होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी 850 एकर जागा देण्यात आली आहे.
ई क्रांती येणार
टोयोटाच्या या प्रकल्पामुळे भारताच्या ई कार निर्मिती उद्योगात क्रांती येईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, 'राज्य शासन देखील इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत असून सार्वजनिक वाहतूक यंत्रणेत देखील वाहनांचा वापर वाढवला आहे. गृहनिर्माण संस्थांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग केंद्र उभारण्यासाठी कायादाय्त आवश्यक ते बदल केले आहेत. राज्यात सर्वोत्तम दळणवळण, कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि जागा उपलब्ध आहे.
टोयोटाचे आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान आणि आमचे कुशल मनुष्यबळ याची चांगली सांगड होईल. राज्यात शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, गृहनिर्माण अशा सुविधा मुबलक उपलब्ध असून कोणत्याही उद्योगाच्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आनंदाने राहता येईल असे वातावरण आहे. राज्य विदेशी गुंतवणुकीत अग्रेसर असून गेल्या दोन वर्षात दावोस येथे झालेल्या 60 दशलक्ष डॉलर्सच्या करारांची 80 टक्के अंमलबजावणी झाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
( नक्की वाचा : मराठवाड्यातील 55 हजार हेक्टर खालसा जमिनी खुल्या होणार, कुणाला होणार फायदा? )
टोयोटा आल्याने अपूर्णता संपली - उपमुख्यमंत्री
यावेळी या कराराचे वर्णन ऐतिहासिक या शब्दात करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात अनेक ऑटोमोबाईल सेक्टर आहेत पण टोयोटा नसल्याने ते अपूर्ण होते. आता राज्यात टोयोटा असल्याने हे सेक्टर पूर्ण झाले आहे. मराठवाड्यातील चेंबर ऑफ कॉमर्स समूह या उद्योगासाठी शासनाच्यावतीने सर्वोतोपरी सहकार्य करेल. या गुंतवणुकीमुळे मराठवाड्यात रोजगार निर्मिती तर होणारच आहे पण आर्थिक प्रगतीही साध्य होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर करण्याकडे वाटचाल सुरु केली आहे. हा करार अर्थव्यवस्था वाढीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास महत्वपूर्ण ठरणार आहे. राज्यात जेएनपीटीसारखे बंदर आहे आणि त्याच्या तीनपट मोठे वाढवणं बंदर होणार आहे. हे देशातील सर्वात मोठे बंदर ठरणार आहे. तसेच जालनामध्ये ड्राय पोर्ट होणार आहे. निर्यातीसाठी उत्तम असल्याने मराठवाड्यात गुंतवणूक म्हणजे निर्यातीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत असेही ते म्हणाले.
( नक्की वाचा : बिल्डरला विक्रीकरातच द्यावी लागणार घरातील सर्व सुविधांची माहिती, समजून घ्या MahaRera चे नवे नियम )
यावेळी मसाकाझु योशीमुरा यांनी देखील आपल्या मनोगतात महाराष्ट्राची निवड या प्रकल्पासाठी करण्यामागची करणे सांगितली. भारत आणि महाराष्ट्राच्या समग्र विकासात टोयोटा देखील एक भागीदार बनू इच्छिते. देशाशी गेल्या अडीच दशकापासून आमचे संबंध असून ते या प्रकल्पाच्या अजून वाढीस लागतील असेही म्हणाले. मानसी टाटा यांनी देखील यावेळी राज्य शासनाचे या प्रकल्पासाठी सहकार्य मिळाल्याबद्धल आभार मानले.