Gold and Silver Price Today : जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये सोने आणि चांदीच्या दराने आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. चांदीच्या दरांनी मोठी उसळी घेत थेट २.८६ लाखांपर्यंत मजल मारली आहे. आज (१५ जानेवारी) अनेक ठिकाणी चांदीचे दर २.९० पर्यंत पोहोचले आहेत. १४ जानेवारी रोजी चांदीचे दर ३ लाखांवर पोहोचले होते. दुसरीकडे सोन्याच्या किमतीत १५०० रुपयांची वाढ होऊन १.४६ लाख प्रति १० ग्रॅमसाठी आकारले जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून चांदीच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. ८ जानेवारीला चांदीची किंमत २,४३,५०० रुपये किलो इतकी होती. त्यानंतर अवघ्या चार दिवसात चांदीच्या किमतीत ४२,५०० रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे.
चांदीचे दर इतक्या झपाट्याने का वाढत आहेत?
जगभरात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सोनं आणि चांदी याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जात आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचा निर्देशांक घसरल्याने मौल्यवान धातू महागला आहे.
पुढील काही दिवसात चांदीची किंमत कमी होईल?
सद्यस्थितीतील चांदीची वाढ केवळ उत्साहाच्या भरात नाही. तर यामागे मजबूत कारणं आहेत. सरकारी कर्ज, महागाईची चिंता आणि रियल इस्टेटच्या मागणीमुळे चांदीला आधार मिळाला होता. चांदीच्या किमतीतील चढ-उतार हा सोन्याहून अधिक गतीने होत आहे. त्याामुळे याच्या किमतीतील जलद वाढीनंतर थोडी घसरण किंवा स्थिरता येऊ शकते. ज्याला करेक्शन म्हटलं जाईल. चांदीचा भाव प्रति औंस ४८ ते ७० डॉलर्सच्या आत राहू शकतो. जर व्याजदर कमी झाला किंवा औद्योगिक मागणी आणखी मजबूत झाली तर चांदीच्या किमती पुन्हा ७५ डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतात.