Gold-Silver Rates: जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि वाढत्या भू-राजकीय तणावामुळे शुक्रवारी 30 जानेवारी रोजी भारतीय सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. चांदीच्या दराने आज पहिल्यांदाच 4 लाख रुपयांचा टप्पा ओलांडून नवा इतिहास रचला आहे. तर सोन्याचे दरही प्रति 10 ग्रॅम 1.83 लाख रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.
भारतीय सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरांनी सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. चांदीच्या दरात आज 4.12 टक्क्यांची मोठी झेप घेत 4,10,100 रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला आहे.
सोन्याचे दरातही विक्रमी भरारी
सोन्याचे दर आज प्रति 10 ग्रॅम 1.83 लाख रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. अमेरिकेचे नवनियुक्त कोषागार सचिव स्कॉट बेसेन्ट यांनी फेडरल रिझर्व्हच्या संभाव्य अध्यक्षांबाबत केलेल्या विधानानंतर जागतिक बाजारात सोन्याची मागणी प्रचंड वाढली आहे. मुंबईत सोन्याच्या दर २४ कॅरेटसाठी 1,78,860 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.
(नक्की वाचा- Economic Survey: पैसेही कमावणार आणि निसर्गही जपणार! आर्थिक सर्वेक्षणात पहिल्यांदाच पर्यावरणावर मोठा 'डाव')
चांदीचा वापर केवळ दागिन्यांसाठीच नाही, तर AI डेटा सेंटर्स आणि सौर ऊर्जेमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असल्याने मागणीत मोठी वाढ झाली आहे. मुंबई आणि दिल्लीत 4,10,100 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
दरवाढीची मुख्य कारणे
रशिया-युक्रेन आणि मध्य पूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे ओढा वाढला आहे. रुपयाचे मूल्य घसरल्याने आणि डॉलरमधील अस्थिरतेमुळे देशांतर्गत किमती वाढल्या आहेत. सौर ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात चांदीची टंचाई भासत असल्याने किमती भडकल्या आहेत.