Investment Tips: शेअर बाजारात अलीकडे झालेल्या घसरणीमुळे सामान्य गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असले, तरी दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही एक मोठी आणि आकर्षक संधी असल्याचे मत HDFC AMC चे दिग्गज फंड मॅनेजर चिराग सेतलवाड यांनी व्यक्त केले आहे. 'NDTV मराठी'शी विशेष संवाद साधताना त्यांनी सध्याच्या बाजारस्थितीचे सखोल विश्लेषण केले असून, आगामी काळातील गुंतवणुकीचा रोडमॅप आणि फायदेशीर रणनीती स्पष्ट केली आहे.
लार्जकॅप कंपन्यांचे मूल्यांकन संतुलित; मिडकॅप, स्मॉलकॅपबाबत सावध
बाजारातील अलीकडील पडझडीनंतर अनेक दर्जेदार कंपन्यांचे समभाग वाजवी दरात उपलब्ध झाले असल्याचे सांगताना चिराग सेतलवाड म्हणाले, "मोठ्या कंपन्यांचे (Large Cap) मूल्यांकन सध्या अत्यंत वाजवी पातळीवर आले आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप अजूनही त्यांच्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा प्रीमियमवर व्यवहार करत असले, तरी मागील काही काळातील करेक्शननंतर परिस्थिती अधिक संतुलित झाली आहे. त्यामुळे निवडक आणि दर्जेदार समभागांमध्ये गुंतवणुकीची नामी संधी उपलब्ध झाली आहे."
पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा फायदा घेत HDFC AMC ने अनेक क्षेत्रांतील समभागांची खरेदी वाढवली आहे. ही रणनीती अल्पकालीन घडामोडींवर नसून व्यवसायाची गुणवत्ता, उत्तम व्यवस्थापन आणि वाजवी मूल्यांकन यावर आधारित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
(नक्की वाचा- Mutual Fund : 25 लाखांचे 2 कोटी कसे कराल? किती वर्षे लागतील? जाणून घ्या महत्त्वाचं गणित)
'या' 3 सेक्टरमध्ये गुंतवणुकीच्या सर्वाधिक संधी
कोणत्या क्षेत्रांमध्ये सध्या सर्वाधिक संधी उपलब्ध आहेत, या प्रश्नावर उत्तर देताना चिराग सेतलवाड यांनी तीन मुख्य क्षेत्रांवर भर दिला.
- वित्तीय सेवा (Financial Services): या क्षेत्रात मालमत्तेची गुणवत्ता उत्तम असून, कर्जवाटपात सातत्याने वाढ होत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) धोरणांचा लाभ या क्षेत्राला मिळत असून मूल्यांकनही अत्यंत आकर्षक आहे.
- ग्राहकोपयोगी वस्तू (FMCG): शहरी भागातील मागणीत आणि ग्रामीण भागातील खरेदीत सुधारणा होत असल्याने या क्षेत्रातील कंपन्या आगामी काळात चांगली कामगिरी करू शकतात.
- माहिती तंत्रज्ञान (IT Sector): आयटी क्षेत्रातील समभागांचे मूल्यांकन घटल्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही एक 'कॉन्ट्रॅरियन बेट' ठरू शकते.
पहिल्या तिमाहीचे निकाल आव्हानात्मक
आगामी तिमाही निकालांबाबत त्यांनी काहीसे सावध राहण्याचे संकेत दिले. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे कच्च्या मालाचे दर वाढल्याने पहिल्या तिमाहीत कंपन्यांच्या नफ्यावर काही प्रमाणात दबाव दिसू शकतो. मात्र, भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत स्थिती अत्यंत मजबूत आहे. सरकारी गुंतवणूक, खासगी भांडवली खर्च, ग्रामीण भागातील मागणी आणि वेतन आयोगाचा संभाव्य सकारात्मक परिणाम यामुळे मध्यम ते दीर्घ कालावधीत कंपन्यांच्या नफ्यात 12 ते 15 टक्के वाढ अपेक्षित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सेतलवाड यांच्या मते, बाजारातील अस्थिरतेला घाबरून न जाता, दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून चांगल्या कंपन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे हीच सध्याची सर्वात प्रभावी रणनीती ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world