महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल देशभरातील बहुतेक राजकीय विश्लेषकांचे अंदाज चुकवणारे ठरले. भारतीय जनता पार्टी, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महायुतीला या निवडणुकीत मतदारांनी निर्विवाद कौल दिला. महायुतीनं 288 पैकी 233 जागा विजय मिळवला. महायुतीला मिळालेल्या दमदार बहुमताचा परिणाम सोमवारी (25 नोव्हेंबर) शेअर मार्केटवर दिसला. त्याचबरोबर, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारातील मरगळ निघून जाईल, असा अंदाज प्रसिद्ध ब्रोकरेज फर्मनं व्यक्त केला आहे.
शेअर मार्केटमध्ये काय होती परिस्थिती?
तिमाही निकालांमध्ये अपेक्षित नफा न मिळाल्यानं गेल्या तीन आठवड्यांत बाजार सातत्यानं खाली घसरत होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल बुधवारी आले. त्यानंतर शुक्रवारी दुपारीच बाजाराचा नूर बदलला. जवळपास महिन्याभराच्या पडझडीनंतर सेन्सेक्स शुक्रवारी एकाच दिवशी 2 हजार अंकांनी उसळला होता.
( नक्की वाचा : 'PM मोदींना नोबेल शांतता पुरस्कार द्या', दिग्गज गुंतवणूकतज्ज्ञांनी केली मागणी )
शेअर बाजारातील ही तेजी सोमवारीही कायम होती. शनिवारी महायुतीला निर्विवाद बहुमत मिळालं. तर उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीतही 9 पैकी 8 जागी भाजपाला यश मिळालं. या सर्वांचा परिणाम शेअर मार्केटवर झाला. सेन्सेक्स सुमारे 1200 अंकांनी उसळला. बाजाराने दोन सत्रात 3 हजार अंकांची झेप घेतली.
मरगळ दूर होणार !
शेअर मार्केटमधील उसळी महाराष्ट्रासाठी गुड न्यूज आहे. मोतीलाल ओसवाल बोक्ररेज फर्मनं महायुतीच्या निर्विवाद यशामुळे शेअर बाजारात आलेली मरगळ आता निघून जाईल असं भाकित वर्तवलं आहे.
मोतीलाल ओसवालच्या रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?
.स्थिर सरकारमुळे पायाभूत सुविधांवरील खर्च वाढेल आणि एकूणच अर्थव्यवस्थेला त्याचा मोठा फायदा होईल असं मोतीलाल ओसवालचं मत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारण आणि अर्थकारणासाठी गेली पाच वर्ष ही एखाद्या काळ्या स्वप्नासारखी होती. राज्यात गेल्या 5 वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री बदलले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना,त्यांनी बुलेट ट्रेन, मुंबई मेट्रो 3 अशा अनेक कामांना स्थगिती दिली. कोरोनाच्या काळात आर्थिक विकासाला मोठी खिळ बसली.त्यानंतर आलेल्या महायुतीच्या सरकारने ही काम सुरु केली, पण, तोपर्यंत अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यंदा मात्र जनतेनं महाराष्ट्रातली अस्थिरता संपवली आहे. विशेष म्हणजे यंदाची आकडेवारी अशी आहे, की 2019 साली झाली तशी आघाडी होऊ शकणार याची पूर्ण तजवीज झालीय. त्यामुळे अर्थ जगतातून निकालाचं मनापासून स्वागत होत आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्र देशाचे औद्योगिक केंद्र आहे. देशाला करांच्या माध्यमातून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी तब्बल 18 टक्के कर महाराष्ट्रातून गोळा होतो. त्यामुळे देशाला आर्थिक प्रगती करायची असेल, तर महाराष्ट्राची प्रगती अत्यंत महत्वाची आहे. राज्याच्या प्रगतीसाठी राजकीय स्थैर्य आणि निर्णय घेण्याची क्षमता आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीच्या झोळीत दिलेलं दोन तृतीयांश बहुमत हे राज्यातल्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं महत्वाचं ठरणार आहे.