पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची धोरणं तसंच निर्णयांमुळे जागतिक स्तरावर ओळख निर्माण केली आहे. मोदी जगातील सर्वच राजकीय बाजूंच्या घटकांशी चर्चा करण्यास सक्षम आहे. या प्रयत्नाांसाठी त्यांना नोबेल शांतता पुरस्कार द्यायला हवा, अशी मागणी दिग्गज गुंतवणूकतज्ज्ञ मार्क मोबियस यांनी केली आहे.
मोदी महान नेते आणि चांगले व्यक्ती
86 वर्षांचे दिग्गज गुंतवणूकदार मोबियस यांनी IANS ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये मोदींच्या कार्यांची जोरदार प्रशंसा केली आहे. पश्चिम आशियातील संघर्ष आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जगात अशांतता आहे. या काळात पंतप्रधान मोदी शांतीदूत ठरु शकतात, असं भाकित त्यांनी केलं.
मोबीयस यांनी पुढं सांगितलं की, 'पंतप्रधान मोदी एक महान नेता आणि चांगले व्यक्ती आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचं महत्त्व वेगानं वाढत आहे. त्यांच्याकडं सर्व प्रकाराच्या राजकीय व्यक्तींशी चर्चा करण्याची क्षमता आहे. आगामी काळात पंतप्रधान मोदी महत्त्वाचे शांतीदूत ठरु शकतात.'
नोबेल शांतता पुरस्काराबाबत बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी या प्रतिष्ठेच्या जागतिक पुरस्काराचे दावेदार आहे. भारताकडं सर्व देशांमध्ये अलिप्त देश म्हणून राहण्याची क्षमता आहे. भारताची ही क्षमता त्यांना जागतिक स्तरावरील शांततेसाठी मध्यस्थ बनण्यात उपयोगी ठरु शकते. संपूर्ण जगात मध्यस्थीची भूमिका बजावण्यासाठी मोदी महत्त्वाचे व्यक्ती आहेत.
( नक्की वाचा : NDTV World Summit : भारताकडे दोन AI ची ताकद, पंतप्रधान मोदींनी सांगितला महत्त्वाकांक्षी भारताचा अजेंडा )
जागतिक शांततेसाठी मोदींचे प्रयत्न
रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष शांततामय मार्गानी समाप्त व्हावा ही भूमिका पंतप्रधान मोदींनी मांडली आहे. पंतप्रधान मोदींनी ऑगस्ट महिन्यात युक्रेनचा दौरा केला होता. युद्धग्रस्त भागात शांततेला चालना देण्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा दौरा महत्त्वाचा होता.
पंतप्रधान मोदी आणि तुमच्यात काय साम्य आहे, असा प्रश्न मोबियस यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, 'आम्ही नेहमी पुढचा विचार करतो. मागचा नाही. त्याचबरोबर जागतिक स्तरावर जे घडत आहे त्याबाबत आम्ही दोघंही आशावादी आहोत.'
अर्थव्यवस्थेवर काय म्हणाले मोबियस?
भारतीयांची सर्जनशील प्रेरणा हा अर्थव्यवस्थेमधील महत्त्वाचा घटक आहे, असं मोबियस यांनी स्पष्ट केलं. भारताचा प्रदीर्घ इतिहास आणि सांस्कृतीक विविधता हे देशाचं एक बलस्थान आहे. भारतामधील प्रत्येक राज्याला स्वत:ची भाषा आणि संस्कृती आहे, असंही त्यांनी सांगितलं.
IANS Exclusive
— IANS (@ians_india) November 12, 2024
Watch: Mark Mobius, Chairman of Mobius Emerging Opportunities Fund, says, The overall economy, I think the key factor is the creative impulse in India. One of India's strengths is its long history, refinement, and preservation of diverse cultures. Each state has… pic.twitter.com/zmC5ENaCCd
पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेचं डिजिटलायझेन केल्यानं अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. पण, अमेरिकेप्रमाणे भारतामध्ये देश आणि राज्य पातळीवरील नोकरशाहीचा मोठा अडथळा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world