Responsible Nations Index: आतापर्यंत जगातील मोठे देश आणि काही संस्था भारताला लोकशाही किंवा सुशासनाच्या बाबतीत रँकिंग देत असतं. . अनेकदा हे अहवाल वस्तुस्थितीवर आधारित नसून केवळ ठराविक लोकांच्या पूर्वग्रहावर अवलंबून असायचे. मात्र, भारताने आता याला जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले आहे. भारताने स्वतःचा रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स (Responsible Nations Index) लाँच केला असून, आता भारत जगाचे प्रगतीपुस्तक तपासणार आहे. नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या एका शानदार सोहळ्यात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते याचे अनावरण करण्यात आले.
काय आहे उद्देश?
गेल्या अनेक वर्षांपासून भारत सातत्याने प्रगती करत असतानाही काही जागतिक निर्देशांकांमध्ये भारताचे स्थान मुद्दाम खाली दाखवले जात होते. 20-22 लोकांच्या मतांवरून अख्ख्या 140 कोटी लोकसंख्येच्या देशाचे भवितव्य ठरवले जात होते. डिजिटल इंडिया, गावागावात पोहोचलेल्या सोयी आणि मतदानातील वाढता उत्साह यांसारख्या ठोस गोष्टींकडे हे अहवाल दुर्लक्ष करत असत.
अर्थतज्ज्ञ संजीव सन्याल यांनी 2022 मध्ये या चुकीच्या पद्धतीवर बोट ठेवले होते. त्यांनी स्पष्ट केले होते की, हे चुकीचे अहवाल केवळ भारताची प्रतिमा मलीन करत नाहीत, तर देशाच्या क्रेडिट रेटिंगवर आणि परकीय गुंतवणुकीवरही वाईट परिणाम करतात.
( नक्की वाचा : Goregaon Mulund Link Road : गोरेगाव ते मुलुंड आता काही मिनिटांत; मुंबईतील सर्वात मोठ्या बोगद्याचे वाचा अपडेट )
आता डेटा बोलणार, धारणा नाही
रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स हा निव्वळ हवेतील गप्पांवर नाही, तर ठोस डेटावर आधारित असेल. वर्ल्ड इंटेलेक्चुअल फाऊंडेशनसोबतच आयआयएम मुंबई आणि जेएनयू सारख्या नामांकित संस्थांनी मिळून हा निर्देशांक तयार केला आहे. यामुळे केवळ भारतच नाही, तर आफ्रिका आणि आग्नेय आशियातील देशांनाही स्वतःची बाजू जगासमोर मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.
भारताचे हे पाऊल म्हणजे केवळ एक रँकिंग नसून पाश्चिमात्य देशांच्या बौद्धिक गुलामगिरीतून मुक्त होण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे.
( नक्की वाचा : Davos 2026 : दावोस म्हणजे नक्की काय आणि त्याचा महाराष्ट्राच्या विकासाशी संबंध काय? वाचा सविस्तर )
काय होणार परिणाम?
या उपक्रमामुळे भारताचा जागतिक दबदबा वाढणार आहे. आतापर्यंत जगाने ठरवून दिलेल्या नियमांवर भारत चालत होता, पण आता भारत स्वतः जागतिक मानके (Global Standards) ठरवणार आहे. नैतिकता, शाश्वत विकास आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती यावर या नवीन निर्देशांकात भर दिला जाणार आहे.
भारताने केवळ टीका करण्याऐवजी स्वतःची एक मजबूत यंत्रणा उभी करून जगाला दाखवून दिले आहे की, एक नवीन आणि आत्मविश्वासू भारत आता जागतिक अजेंडा सेट करण्यासाठी सज्ज आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world