Maharashtra Budget 2024 : अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प शुक्रवारी (28 जून) सादर केला. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर ही राज्यातील तीन प्रमुख महानगरं आहेत. या महानगरातून रोज लाखो लोकं वेगवेगळ्या कामांसाठी प्रवास करतात. त्यांचा हा प्रवास हा सोपा आणि जलद व्हावा यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. या तीन शहरांमध्ये एकूण 449 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे.
( 'NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्यातील पायाभूत सुविधांसाठी बजेटमधील तरतुदी
- मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये एकूण 449 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्यास मान्यता -127 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या - या वर्षात आणखी 37 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार
- शिवडी-वरळी जोडरस्त्याचे काम डिसेंबर 2025 अखेर पूर्ण करण्यात येणार
- ठाणे किनारी मार्ग- लांबी 13.45 किलोमीटर - 3 हजार 364 कोटी रुपये किमतीचे काम मे 2028 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित
- प्रधानमंत्री ग्रामसडक योजना- तिसऱ्या टप्पा-सुमारे 6 हजार 500 किलोमीटर लांबीच्या रस्ते सुधारणांचे उद्दीष्ट -2 हजार 303 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण
- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात 23 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे 3 वर्षात पूर्ण करण्यात येणार
- भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजनेसाठी 1 हजार 400 कोटी रुपयांची तरतूद
- संत सेवालाल महाराज जोडरस्ता योजना तसेच यशवंतराव होळकर जोडरस्ते योजनेची लवकरच अंमलबजावणी
- 19 महानगरपालिकांमध्ये पीएम ई-बस सेवा योजना राबविण्यात येणार
( नक्की वाचा : Maharashtra Budget 2024 : दुधाचे दर कमी होणार? अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी खास सवलती )
राज्याच्या विधानसभा निवडणुका या 3 महिन्यांवरच आल्या आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील महिला, शेतकरी आणि तरुणांसाठी खास घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी या बजेटमध्ये मांडल्या आहेत. मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही महिलांसाठी 'लाडकी बहीण' योजना सुरु करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रतिमाह 1500 रुपये जमा होणार आहेत. 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. जुलै महिन्यापासूनच ही योजना सुरु होणार आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना,या योजनेअंतर्गत सर्वांना सिलेंडर परवडेल यासाठी पात्र कुटुबियांना दरवर्षी 3 मोफत सिलेंडर देण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. राज्यातील जवळपास 52 लाख 16 हजार कुटुबियांना या योजनेचा लाभ होईल.