Adani Enterprises 32nd AGM: कोणतेही आव्हान आमच्या पायाची वीट एक इंचही हलवू शकणार नाही - गौतम अदाणी

गौतम अदाणी (Gautam Adani) यांनी आपल्या भाषणात मागच्या वर्षी काही परदेशी शॉर्ट सेलरने केलेल्या खोट्या आरोपांबद्दल भाष्य केलं.

Advertisement
Read Time: 2 mins

अदाणी उद्योग समुहाची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेत अदाणी उद्योग समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांनी समभागधारकांना (शेअरहोल्डर्स) ना संबोधित केलं. यादरम्यान विविध मुद्द्यांवर भाष्य करत असताना गौतम अदाणी यांनी कोणतंही आव्हान आमच्या पायाची वीट एक इंचही हलवू शकणार नाही असे स्पष्ट केलं.

गौतम अदाणी यांनी आपल्या भाषणात काही परदेशी शॉर्ट सेलरने केलेल्या खोट्या आरोपांबद्दल भाष्य केलं. या आरोपांचा सामना करत अदाणी उद्योगसमूह अधिक मजबुतीने उभा राहिला आहे असं अदाणी यांनी म्हटले. या प्रकरणात अदाणी उद्योग समुहाच्या प्रामाणिकतेवर आणि सचोटीवर सर्वोच्च न्यायालयानेही मोहोर उमटवली असल्याचं अदाणी यांनी सांगितलं.

शॉर्ट सेलरकडून झालेल्या आरोपांबद्दल बोलताना गौतम अदाणी म्हणाले, "अदाणी समुहाने फक्त या आव्हानाचा सामनाच केला नाही तर आरोपांशी लढताना आम्ही अधिक मजबुतीने उभे राहिलो. यातून हेच सिद्ध होतं की कोणतही आव्हान आमचा पाया डळमळीत करु शकणार नाही. जेव्हा परिस्थिती आपल्या विरोधात असते तेव्हा एकत्र होऊन त्याविरोधात लढण्याची क्षमता तुमची सफलता निश्चित करते", असं गौतम अदाणी यांनी स्पष्ट केलं.

या विषयावर अधिक भाष्य करताना अदाणी म्हणाले, "मागच्या वर्षी आपण ज्या पद्धतीने दृढता दाखवली ती खरंच कौतुकास पात्र होती. शॉर्ट सेलरद्वारे आपल्या ईमानदारी आणि प्रतिष्ठेवर जे हल्ले झाले त्याचा आपण सर्वांनी सामना केला. आपण सिद्ध करुन दाखवलं की कोणतंही आव्हान आमचा पाया डळमळीत करु शकणार नाही."

Advertisement

दुहेरी आव्हानाचा सामना करत उभा राहिला अदाणी उद्योग समूह -

"मागच्या वर्षी आपल्याला दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागला होता. शॉर्ट सेलरने दोन्ही बाजूंनी हल्ले केले. एका बाजूला चुकीची माहिती पसरवली जात होती तर दुसरीकडे एका महत्वपूर्ण FPO (Follow on Public Offer) दरम्यान आपल्यावर राजकीय आरोप लावण्यात आले. परंतु या दोन्ही संकटांचा सामना करतानाही आपण अनेक विक्रम प्रस्थापित केले", असं गौतम अदाणी म्हणाले.

गुंतवणूकदारांचा विश्वास सर्वात महत्वाचा -

ज्यावेळी आपण FPO (Follow on Public Offer) घेत होतो, त्याच दरम्यान विदेशी शॉर्ट सेलरकडून हल्ला झाला. हा हल्ला अदाणी उद्योग समुहाला बदनाम करण्यासाठी, मार्केटमधील आपल्या प्रतिष्ठेला डाग लावण्याच्या उद्देशाने केला होता. ही मोहीम काही माध्यमांनी पुढे सुरू ठेवली होती, असं गौतम अदाणी यांनी सांगितलं.

परंतु अदाणी उद्योग समूह गुंतवणुकदारांचा विश्वास आणि त्यांचं हित याला सर्वात जास्त प्राधान्य देतो. या आरोपांची चौकशी होत असताना आम्ही FPO द्वारे जमवलेले 20 हजार कोटी गुंतवणूकदारांना परत केले. आतापर्यंत आम्ही जमवलेली ही मोठी रक्कम असतानाही आम्ही पैसे परत करण्याचा निर्णय घेतला. आमचा हाच निर्णय गुंतवणुकदारांप्रती आमचा विश्वास अधोरेखित करतो असं अदाणी यांनी स्पष्ट केलं.
 

Advertisement

(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)