गळेकापू स्पर्धेमध्ये खासगी क्षेत्रात नोकरीची हमी कोणी देऊ शकत नाही. फक्त भारतातच नाही तर विदेशातही अनेकांना नोकरीवरून तडकाफडकी काढून टाकलं जातं. अशावेळी पुढे काय करायचं हा प्रश्न नोकरीवरून काढलेल्यांपुढे निर्माण होतो. दिल्लीत राहणाऱ्या एका 36 वर्षांच्या तरुणाला Microsoft मधून काढून टाकलं होतं. नोकरीवरून काढल्यानंतर आपण घरबसल्या दीड लाख रुपये काहीही न करता कमावत असल्याची माहिती या तरुणाने दिली आहे. रेडीट (Reddit) वर त्याने एक पोस्ट केली असून तो पैसा कसा कमावतोय हे त्याने सांगितलं आहे.
( नक्की वाचा: 40,000 रुपयांचा EMI भरावा की 40,000 रुपयांचे भाडे देऊन रहावे ? )
नोकरी नसतानाही कमाई कशी?
या तरुणाने रेडिट (Reddit) वर लिहिलेल्या पोस्टची सुरूवात करताना म्हटलंय की, "मित्रांनो, आज मला नोकरीवरून काढण्यात आले, पण मी पूर्णपणे कंगाल झालेलो नाही. मला आता दुसरी नोकरी करायची नाहीये." या तरुणाने त्याच्या पोस्टमध्ये त्याच्याबद्दलची अधिक माहिती देताना म्हटलंय की त्याच्या कुटुंबात पत्नी, मुलगी आणि आई आहेत. नोकरीवरून काढल्याच्या क्षणी त्याला महिन्याला किती खर्च येतो याचा त्याने पूर्ण तपशील दिला आहे. यामध्ये किराणा मालासह इतर घरगुती वापरासाठी लागणाऱ्या गोष्टींचा समावेश आहे. सगळे खर्च मिळून त्याला महिन्याला 85,000 ते 90,000 रुपये लागतात असे त्याने म्हटले आहे. वर्षातून तो कुटुंबासह दोन ते तीन वेळा फिरायला जातो आणि त्यासाठी त्याला किमान 20 हजार रुपये लागतात. या तरुणाने म्हटलंय की कदाचित आता त्याला फिरण्यासाठी होणारा खर्च कमी करावा लागेल. या तरुणाने त्याला घरबसल्या पैसे कसे मिळतायत याचा तपशील दिला. त्याने म्हटलंय की,
- सात मालमत्ता भाड्याने दिल्या: दरमहा 1,20,000 रुपये (यात दरवर्षी 4-5% वाढ होते).
- लाभांश: दरमहा 40,000-45,000 रुपये (2.5 कोटी रुपयांच्या पोर्टफोलिओमधून मिळणारे मासिक सरासरी उत्पन्न).
- बँकेचे व्याज: दरमहा 6,000 रुपये (12 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून).
- या सर्व स्थिर उत्पन्नातून त्याला दरमहा सुमारे 1.5-1.6 लाख रुपये मिळतात.
( नक्की वाचा: Microsoft ने पाकिस्तानातील दुकान बंद केले, 9 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ )
याशिवाय या तरुणाकडे अन्य दोन मालमत्ता आहे, तरुणाच्या कुटुंबीयांकडे 28 ते 30 लाख रुपये किंमतीचे सोने आणि चांदी आहे, 12 लाख रुपयांची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक असून त्याच्याकडे 65 ते 70 लाख रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे. या तरुणाने पुढे म्हटलंय की, "भाड्याने दिलेल्या मालमत्तांमधून मला चांगले उत्पन्न मिळतंय, पण एकूण दीड कोटी रुपयांच्या मालमत्ता या अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. या मालमत्तांसाठी 45% रक्कम भरली आहे, या मालमत्तांसाठी एकूण मिळून 80 लाखांची रक्कम येत्या 2-3 वर्षांत करायची आहे."
वाढत जाणाऱ्या खर्चाची चिंता
या तरुणाने आपल्याकडे असलेली रोख रक्कम मालमत्तांचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या तरुणाला दुसरे मूल होणार होते त्यासाठीही त्याने रोख रकमेतील ठराविक रक्कम वेगळी काढून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाळंतपणात मी सोबत असल्याने बायको आनंदी असल्याचं त्याचं म्हणणं आहे. मात्र भविष्यातील गोष्टींसाठी आपल्याकडे असलेली रक्कम पुरेशी आहे का हा प्रश्न अजूनही या तरुणाला सतावतो आहे. मी नोकरी करणार नाही, कारण नोकरी करत अलसताना भयानक मानसिक त्रास सहन केला आहे. मला रात्री वाईट स्वप्ने पडायची आणि हे सगळं माझ्या बायकोने पाहिले आहे असं या तरुणाने म्हटलंय.
( नक्की वाचा: कोण आहेत 6700 कोटींची कंपनी 'रॅपिडो'चे मालक? )
या तरुणाच्या पोस्टवर विविध प्रतिक्रिया बघायला मिळतायत, एकाने म्हटलंय की, "वयाच्या, 36 व्या वर्षी तुझी आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे. मला वाटतंय की तुला परदेशातील आयटीचा जॉब मिळाला होता आणि तू वर्क फ्रॉम होम करत असावास. " दुसऱ्या एकाने म्हटलंय की, "तुम्ही आर्थिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत आहात. कुटुंबासोबत काही वेळ घालवा. कधीकधी अशा घटनांमुळे तुम्हाला आयुष्य वेगळ्या नजरेतून पाहण्याची संधी मिळते. तुम्ही मायक्रोसॉफ्टचे कर्मचारी होतात का?" यावर या तरुणाने हसत उलट प्रश्न विचारला की तुम्हाला कसे माहिती ? यावर प्रश्न विचारणाऱ्याने म्हटले की, "जर मायक्रोसॉफ्टची नोकरी असेल, तर तुम्हाला नोकरीवरून काढून टाकताना काही महिन्यांचे चांगले पॅकेज मिळेल. काहीही न करता पैसे मिळत आहेत असे समजा आणि आराम करा. "