शेअर बाजारात आज मोठी उसळी पाहायला मिळाली. ग्लोबस मार्केटमधून मिळालेल्या संमिश्र संकेतांदरम्यान, देशांतर्गत शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
सेन्सेक्सनेही गाठला 85,000 चा टप्पा
शेअर बाजार उघडताच सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी 26,066.90 पर्यंत पोहोचला. सुरुवातीच्या सत्रात निफ्टी 50 159.10 अंकांच्या म्हणजेच 0.62% उसळीसह 26,027.70 वर व्यवहार करत आहे. तर सेन्सेक्स देखील आज मोठ्या कालावधीनंतर 85,000 चा टप्पा पार करून 85,160.70 पर्यंत पोहोचला. सेन्सेक्सही 525.12 अंकांच्या म्हणजेत 0.62% तेजीसह 84,951.46 वर व्यवहार करत आहे.
(नक्की वाचा- Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)
निफ्टीचा 26,000 चा टप्पा
निफ्टी 50 ने जवळपास 13 महिन्यांनंतर पुन्हा एकदा 26,000 चा महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी, निफ्टीने 30 सप्टेंबर 2024 रोजी इंट्रा-डे मध्ये हा टप्पा गाठला होता. 27 सप्टेंबर 2024 रोजी इंट्रा-डे मध्ये निफ्टीने 26,277.35 या विक्रमी उच्चांकाची नोंद केली होती.
(नक्की वाचा- Halal food: भारतात 'हलाल फूड'च्या मागणीत प्रचंड वाढ, बाजार मूल्य 19 अब्ज डॉलरवर!)
गुंतवणूकदार मालामाल
बाजार उघडताच आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 1.62 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. याचा अर्थ, बाजार सुरू होताच गुंतवणूकदारांची संपत्ती 1.62 लाख कोटींनी वाढली आहे. 21 ऑक्टोबर 2025 रोजी बीएसईवरील सर्व शेअर्सचे एकूण बाजार भांडवल 4,70,89,049.29 कोटी रुपये होते. ते आज, 23 ऑक्टोबर 2025 रोजी बाजार उघडताच हे बाजार भांडवल 4,72,51,744.03 कोटींवर पोहोचले.