भारतीय शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. दुपारच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 600 हून अधिक अंकांची वाढ झाली आणि तो पुन्हा एकदा 83,000 च्या स्तरावर पोहोचला. त्याचप्रमाणे, निफ्टीही वाढून 25,500 च्या पातळीवर पोहोचला. रियल्टी, ऑटो (Auto) आणि बँकिंग क्षेत्रातील समभाग सर्वाधिक तेजीत होते.
दिवसअखेर सेन्सेक्स 862 अंकांनी किंवा 1.04 टक्क्यांनी वाढून 83,467 वर पोहोचला, तर निफ्टी 261 अंकांनी किंवा 1.03 टक्क्यांनी वाढून 25,585 या जवळपास चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला.
शेअर बाजारातील तेजीची कारणे
बँकिंग शेअरमध्ये वाढ
बँकिंग क्षेत्रात मजबूत दिसून आली. बँक निफ्टीने मागील दिवसाची घट भरून काढत 0.5% ची वाढ नोंदवली. एक्सिस बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बँकमध्ये जोरदार खरेदी झाली. अॅक्सिस बँकेच्या समभागात सप्टेंबर तिमाहीच्या निकालांनंतर 4 टक्क्यांपर्यंत तेजी आली.
(नक्की वाचा- Ola Shakti:'ओला शक्ती' लॉन्च! विजेशिवाय चालणार AC, फ्रिजसारखी उपकरणे; पाहा किंमत)
भारतीय रुपयाला मजबूती
भारतीय रुपया गुरुवारी 40 पैशांनी वाढून प्रति डॉलर 87.68 रुपयांच्या स्तरावर पोहोचला. परकीय चलन व्यापारातील तज्ज्ञांनुसार, केंद्रीय बँकेचा हस्तक्षेप, डॉलर इंडेक्सची कमजोरी आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण यामुळे रुपयाला मजबूती मिळाली आहे.
विदेशी गुंतवणूकदारांची खरेदी
प्रदीर्घ कालावधीनंतर विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FIIs) भारतीय शेअर बाजारात परतले आहेत. बुधवार, 15 ऑक्टोबर रोजी त्यांनी भारतीय बाजारात 68.64 कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली. गेल्या 7 दिवसांत त्यांनी 3,000 कोटींहून अधिक गुंतवणूक केली आहे.
याशिवाय बहुतांश आशियाई शेअर बाजारातही तेजी होती, ज्यामुळे भारतीय बाजाराला पाठिंबा मिळाला. दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई 225 आणि शांघाय कंपोजिट इंडेक्स हे सर्व सकाळच्या सत्रात वाढीसह व्यवहार करत होते.