गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शेअर मार्केटमध्ये उसळी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. आज 9 एप्रिल रोजी पहिल्यांदात सेन्सेक्स 75,000 आणि निफ्टी 22,700 इतका उचांक गाठला आहे.
देशभरात हिंदू नववर्षाच्या उत्सवाची तयारी सुरू आहे. दरम्यान आज निफ्टी आणि सेन्सेक्स दोघांच्या व्यापाराची सुरुवात नव्या उंचाकावरुन करण्यात आली आहे. बीएसई सेन्सेक्स आज सकाळी 382 च्या अंकानी उसळी घेत 75,124.28 ने उघडला. इतिहास रचण्यात निफ्टीही मागे राहिला नाही. निफ्टीने आज 98 अंकांच्या उसळीसह 22,765 च्या स्तरापासून आज दिवसाची सुरुवात केली. मे 2014 साली सेन्सेक्सने पहिल्यांदा 25 हजारांचा टप्पा गाठला होता. तर 21 जानेवारी 2021 रोजी 50 हजारांचा टप्पा ओलांडला होता.
या कालावधीत सेन्सेक्स निर्देशांकातील 30 शेअर्समध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल 11,90,638 कोटी रुपयांनी वाढले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL), स्टेट बँक ऑफ इंडिया, भारती एअरटेल लिमिटेड आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या समभागांनी सेन्सेक्सच्या मार्केट कॅपमध्ये प्रत्येकी 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त योगदान दिले.
टाटा समूहाचे दोन शेअर टाटा मोटर्स लिमिटेड आणि टाटा स्टील लिमिटेड हे दोन्ही शेअर्स सर्वाधिक लाभ मिळविणाऱ्या पाच शेअर्समध्ये सामील आहेत. सर्वाधिक फायदा मिळविणाऱ्या अन्य शेअर्समध्ये सन फार्मास्युटिकल्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एनटीपीसी यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे आयटीसी लिमिटेड, हिंदुस्तान युनिलीवर लिमिटेड आणि एशियन पेंट्स लिमिटेड सारख्या एफएमसीजी व्यवसाय करणारे शेअर आणि एचडीएफसी बँक लिमिटेड आणि ॲक्सिस बँक लिमिटेड या खासगी कर्जदारांना निर्देशांकात सर्वाधिक नुकसान झाले.