मार्च महिना आला की सर्वांना इन्कम टॅक्स भरण्याचे वेध लागतात. 31 मार्च ही इन्कम टॅक्स भरण्याची अंतिम तारीख आहे. हे विवरण सादर करण्यापूर्वी प्रत्येक जण आपला पैसा कसा वाचेल यासाठी प्रयत्न करत असतात. तुम्ही देखील इन्कम टॅक्स वाचवण्याचे मार्ग शोधत असाल तर आम्ही तुम्हाला एक उत्तम पर्याय सुचवणार आहोत. यामुळे तुमचा टॅक्स वाचेल त्याचबरोबर तुमच्या मुलीच्या भविष्याची काळजीही मिटेल.
इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana- SSY) हा चांगला पर्याय आहे. ही तुमच्या मुलींच्या नावानं होणारी अल्प कर बचत योजना आहे. या तिमाहीमध्ये या योजनेवर 8.2 टक्के व्याज आहे. टॅक्समध्ये फायदा मिळणाऱ्या अन्य कोणत्याही अल्प बचत योजनेपेक्षा हे दर जास्त आहेत. अल्प बचतीमध्ये फक्त पोस्ट ऑफिस आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांना इतके व्याज मिळते. या योजनेअंतर्गत 1.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर 80C अंतर्गत कर सवलत मिळते.
मोठी बचत करण्याची संधी
सुकन्या समृद्धी योजनेनुसार तुमचा टॅक्स तर वाचतोच. त्याचबरोर दीर्घ कालावधीसाठी तुम्ही शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास तुम्ही मोठी रक्कम जमा करु शकता. या योजनेत तिपटीपेक्षा जास्त रिटर्न मिळण्याची हमी आहे. प्रत्येक वर्षी या योजनेत कमाल 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरीटीपर्यंत 70 लाख रुपयांचा फंड जमा होऊ शकते. या कालावधीत तुम्ही केलेल्या 22.50 लाख रुपये गुंतवणुकीच्या तुलनेत ही जवळपास तिप्पट रक्कम आहे.
कसा मिळणार तिप्पट परतावा?
SSY मधील व्याज दर : 8.2% वार्षिक
कमाल गुंतवणूक : 1.5 लाख वार्षिक
15 वर्षातील एकूण गुंतवणूक : 22,50,000 रुपये (22.50 लाख रुपये)
21 वर्षांनंतर मॅच्युरेटीमध्ये मिळणारी रक्कम : 69.80 लाख रुपये
फायदा : 47.30 लाख रुपये
करमुक्त योजना
सुकन्या समृद्धी योजना करमुक्त आहे. यामध्ये EEE (Exempt-Exempt-Exempt) अंतर्गत तीन वेगवेगळ्या प्रकरारे करामध्ये सवलत मिळते. सर्वात प्रथम आयकरमधील 80 C कलम अंतर्गत 1.5 लाखांपर्यंतच्या वार्षिक गुंतवणुकीवर सवलत आहे. त्याचबरोबर या योजनेतील व्याजावर कर लागत नाही. त्याचबरोबर या योजनेच्या मॅच्युरिटीच्यावेळी मिळणारी संपूर्ण रक्कम ही करमुक्त आहे. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात 22 जानेवारी 2022 रोजी 'बेटी पढाओ, बेटी बचाओ' या अभियानांतर्गत ही योजना सुरु करण्यात आली होती.
सर्वात खास गोष्ट!
सुकन्या समृद्धी योजनेनुसार 21 वर्षांनंतर मॅच्युरिटीची रक्कम मिळते. पण तुम्हाला 15 वर्षांपर्यंतच गुंतवणूक करावी लागते. गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर 6 अतिरिक्त वर्षाचे व्याज तुम्हाला मिळते. तुम्ही तुमची मुलगी 3 वर्षांची असताना हे खातं सुरु केलं तर तिच्या 24 व्या वर्षी हे खातं मॅच्युअर होईल. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर ती स्वत: हे खातं मॅनेज करु शकते.
काय आहेत निकष?
या योजनेनुसार 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडू शकता. त्यासाठी मुलीचं जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याचबरोबर पालकांचे ओळखपत्र आणि पत्ता सांगणारी कागदपत्र आवश्यक आहे. तुम्ही 2 मुलींच्या नावावर वेगवेगळी खाती उघडू शकता. जुळ्या मुली असतील तर 2 पेक्षा जास्त खाती उघडता येतात.
या योजनेमध्ये कमाल गुंतवणूक करण्याची वार्षिक रक्कम 1.5 लाख तर किमान रक्कम 250 रुपये आहे. तुम्ही वर्षातून एकदाच 1.5 लाख रुपये खात्यात भरु शकता. अथवा दरमहा 12,500 रुपयांचा हफ्ताही जमा करु शकता.
व्याज कधी जमा होते?
सुकन्या समृद्धी योजनेनुसार दर महिन्याच्या पाचव्या तारखेपासून ते महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत खात्यात जमा असणाऱ्या रकमेच्या आधारावर व्यााज दिले जाते. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी व्याजाची रक्कम खात्यात जमा होते.
कधी रक्कम काढता येते?
मुलीनं 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर तिच्या लग्नासाठी 50 टक्के रक्कम काढता येऊ शकते. त्याचबरोबर खातं सुरु केल्यानंतर 5 वर्षांनी काही विशिष्ट कारणांसाठी मॅच्युरिटीपूर्वीही पैसे काढता येतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world