Telegram - झोलर लोकांचा नवा अड्डा, रोज घातला जातोय कोट्यवधींचा गंडा

उत्तर प्रदेशातील एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत असलेल्या दिनेशला जबरदस्त नफ्याची स्वप्ने दाखवण्यात आली होती. हा पैसा भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्याचं दिनेशने ठरवलं होतं.

Advertisement
Read Time: 4 mins
मुंबई:

दुर्वा मोरे

जवळपास दोन महिन्यांपूर्वी दिनेश नावाच्या एका व्यक्तीने टेलिग्रामवरील ग्रुपमधील आकर्षक गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करण्याचं ठरवलं होतं. दिनेशची रक्कम फॉरेक्स, शेअर्स, म्युच्युअल फंड आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवली जाईल असं त्याला आश्वासन देण्यात आलं होतं. उत्तर प्रदेशातील एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत असलेल्या दिनेशला जबरदस्त नफ्याची स्वप्ने दाखवण्यात आली होती. हा पैसा भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्याचं दिनेशने ठरवलं होतं. 10  दिवसांच्या अंतरात दिनेशने टेलिग्रामवरून आकर्षक परताव्याची आमीषे दाखवणाऱ्यांच्या खात्यात 2 लाख रुपये जमा केले. दिनेशने दोन वर्षांची कमाई गुंतवण्याचा निर्णय घेतला होता. गुंतवणूक काही दिवसांतच दुप्पट होईल असं त्याला वाटलं होतं. दिनेशला झटपट श्रीमंत होऊ अशी स्वप्ने पडू लागली. या स्वप्नांमुळे त्याला छान जोपत लागत होती. मात्र एके दिवशी असं काही घटलं की त्याची झोपच उडाली आहे. दिनेशने जेव्हा गुंतवणुकीबद्दलचा तपशील विचारला तेव्हा त्याला टेलिग्रामवर ब्लॉक करण्यात आले. दोन वर्ष काबाडकष्ट करून जमा केलेली रक्कम टेलिग्रामवरील झोलर लोकांनी दिलेल्या आकर्षक परताव्याच्या आमीषापोटी गमावली आहे.

हे ही वाचा : Gold Rate : सोन्यामध्ये विक्रमी वाढ, कितीने वाढलं? दिवाळीपर्यंत सोनं किती महाग होणार? 

दिनेशने या सगळ्या प्रकाराबद्दल बांडवल बाजार नियामकांकडे तक्रार केली मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. टेलिग्रामचा वापर करून लोकांना कशाप्रकारे गंडा घातला जातोय याचे हे एक उदाहरण आहे. या सगळ्या घोटाळेबाजांची मोडस ऑपरेंडी एकदम साधी आहे. लोकांना जबरदस्त परताव्याची आमीषे दाखवायची. लोकांनी त्याला भुलून पैसे गुंतवले की ते घेऊन गायब व्हायचे. हा प्रकार सध्या सबंध भारतामध्ये जोरात सुरू आहे. हे प्रकार कसे होतात याचा आम्ही मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला ज्या गोष्टी प्रकर्षाने दिसल्या त्या खालीलप्रमाणे आहेत.

हे ही वाचा: Investment Tips : अवघ्या 1000 रुपयांनी गुंतवणूक सुरु करा अन् बना करोडपती!

कॅट फिशिंग

यामध्ये भोळ्या भाबड्या लोकांच्या मनात खोटी खोटी सुरक्षेची भावना निर्माण केली जाते. घोटाळेबाज या गुंतवणूकदारांसमोर आपण फार मोठे शेअर बाजारातील इन्फ्लुएन्सर असल्याचे चित्र उभे करतात. दिनेशवर 'मोहित अग्रवाल' ने मोहिनी घातली होती. गंमत अशी आहे की एक मोहित अग्रवाल आहे ज्यांनी इंट्रा डे मॅच नावाचे टेलिग्राम अकाऊंट सुरू केले होते. अग्रवाल हे बरेच प्रसिद्ध झाले आणि त्याचा गैरफायदा घेत घोटाळेबाजांनी मोहित अग्रवाल आणि इंट्राडे मॅच नाव वापरून बोगस टेलिग्राम ग्रुप्स सुरू केले. घोटाळेबाजांनी मोहित अग्रवाल यांचे नाव, जीएसटी नंबर , रजिस्ट्रेशन नंबर वापरत खोटी बिलेही बनवली. ग्रामीण भागातील गरीब लोकं या घोटाळेबाजांचे आवडते सावज असते. घोटाळेबाजांनी व्यवहारासाठी या गरीब लोकांची बँक खाती भाड्याने घेतली होती. भाड्यापोटी या गरिबांना घोटाळेबाज 5-10 हजार रुपये देत होते. बँक व्यवहार या गरिबांच्या खात्यातून झाल्याने घोटाळेबाजांपर्यंत पोहोचणे तपास यंत्रणांना शक्य होत नाही.

दामदुप्पट परताव्याच्या लॉटरीची स्वप्न

यामध्ये गुंतवणूकदाराला दामदुप्पट, बंपर अशा नफ्याचं स्वप्न दाखवलं जातं. यामुळे तत्काळ आणि झटपट नफ्यासाठी उतावीळ लोकं याकडे पटकन आकर्षित झाले. यामध्ये गुंतवणूकदारांना सुरुवातीला थोडासा नफा दिलाही जातो. ज्याला भुलून गुंतवणूकदार आणखी गुंतवणूक करत जातात. या प्रकारामध्ये सुरुवातीला सावध असलेले गुंतवणूकदार 3 ते 5 हजार रुपये गुंतवतात. त्यावर चांगला परतावा दिसला की ते घोटाळेबाजांच्या गळाला लागतात.

घोटाळेबाजांचे कोळ्याचे जाळे

कोळी जसा आपल्या जाळ्यामध्ये सावजाला अडकवतो तसेच घोटाळेबाज साध्याभोळ्या गुंतवणूकदारांना अडकवतात. रांचीमधील कबिराज डेअरी फार्मचे संस्थापक राहुल शहादेव यांना एकेदिवशी फोन आला होता. त्यांना शेअर बाजाराचे सखोल ज्ञान देणाऱ्या कोर्सबाबत आणि त्यासाठी उच्च गुणवत्तेच्या शैक्षणिक सामुग्रीबाबत माहिती देण्यात आली. घोटाळेबाजांनी शहादेव यांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठीच्या एक लिंक पाठवली. त्यात एका अॅपची लिंक होती जी त्यांना डाऊनलोड करायला सांगितली होती. शहादेव ती डाऊनलोड केली आणि सुरूवातीला 50 हजार रुपये गुंतवले, सुरुवातीला त्यांना अनुभव चांगला आला होता. यामुळे घोटाळेबाजांनी त्यांना आणखी पैसे गुंतवायला सांगितले. या अॅपद्वारे शहादेव यांनी 51 लाख रुपये गुंतवले ज्यावर नफा मिळून त्यांची गुंतवणूक एक कोटी रुपये झाल्याचे त्यांना अॅपमध्ये दिसू लागले होते. शहादेव यांनी पैसे काढण्याचा विषय काढताच घोटाळेबाज गायब झाले.

अनेकदा गुंतवणूक करणारे फसवले गेल्यानंतर पोलिसांकडे किंवा सेबीकडे तक्रार करतात मात्र त्यांना फारशी मदत मिळत नाही अशी त्यांची तक्रार असते. मात्र शहादेव यांच्यासारखे गुंतवणूकदार जेव्हा फसवणूक झाल्याचे कळाल्यानंतर तातडीने पोलिसांत धाव घेतली ज्यामुळे पोलिसांनी 24 लाखांची रक्कम गोठवली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असलेले असे प्रकारचे घोटाळे रोखण्यासाठी सरकारने काहीतरी हालचाली करणे गरजेचे असल्याचे केडिया फिनकॉर्पच्या नितीन केडिया यांनी म्हटले आहे. सेबीने टेस्क्ट मेसेजवर नियंत्रण आणले असले तरी टेलिग्रामबाबत असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे केडिया यांचे म्हणणे आहे.

फसवणूक झाल्यास काय करायचे ?

3 ऑगस्ट रोजी मुंबई सायबर पोलिसांनी '1930' हा नंबर सुरू केला होता. या हेल्पलाईनच्या माध्यमातून गेल्या & महिन्यांमध्ये, विविध नागरिकांची होणारी 100 कोटींची फसवणूक रोखण्यात यश आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. शेअर ट्रेडींग, कुरिअर, डिजिटल अरेस्ट, ऑनलाईन टास्क अशा विविध प्रकारच्या संकटांपासून नागरिकांचे रक्षण केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी म्हटले आहे की कोणतेही अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याबद्दलची माहिती शोधावी, कोणतीही वेबसाईट ओपन करण्यापूर्वी त्याबद्दलचीही माहिती तपासावी. सोशल मीडियावरील जाहिरातींपासून सावध राहावे. अस्सल शेअर ट्रेडींग कंपनी या कधीही गुंतवणूकदारांना खासगी व्यक्तींच्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगत नाहीत. गुंतवणूकदार सावध आणि सजग असतील तर ते कधीही फसवले जाऊ शकत नाहीत असे पोलिसांनी म्हटले आहे.

Topics mentioned in this article