रामराजे शिंदे, प्रतिनिधी
अरविंद केजरीवाल यांनी (Arvind Kejriwal) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानंतर दिल्लीचा मुख्यमंत्री कोण असणार यावर चर्चा सुरू झाली आहे. अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदीया यांच्यानंतर आपमध्ये पाच महत्त्वाचे नेते आहेत. त्यात दोन महिला आहेत. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिला मुख्यमंत्री देण्याचा विचार आम आदमी पार्टी करत आहे. पाहूया मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील कोण आहेत, पाच महत्त्वाचे चेहरे?
1 सुनिता केजरीवालः अरविंद केजरीवाल यांच्या नंतर पक्षात सर्वात महत्त्वाच्या नेत्या सुनिता केजरीवाल आहेत. केजरीवाल तिहार तुरुंगात गेल्यानंतर सुनिता केजरीवाल सक्रिय राजकारणात आल्या. लोकसभा निवडणुकीत प्रचाराची धुरा सुनिता केजरीवाल यांनीच सांभाळली. रामलीला मैदानात विरोधकांनी घेतलेल्या सभेत त्या सहभागी झाल्या होत्या. शिवाय उद्धव ठाकरे दिल्ली दौ-यावर असताना सुनिता केजरीवाल यांची भेट घेतली होती. प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांशी संपर्क ठेवण्याचं काम सुनिता केजरीवाल यांनी केलं. शिवाय ईडी सीबीआयच्या गैरवापरावरून भाजप विरोधात जनमत बनवण्यातही सुनिता केजरीवाल यांची मुख्य भूमिका होती. परंतु केजरीवालांनी पत्नीला मुख्यमंत्री बनवलं तर घराणेशाहीचा आरोप होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
2 आतिशी मार्लेनाः मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेलं दुसरं महत्त्वाचं नाव म्हणजे आतिशी मार्लेना. इतर नेत्यांच्या तुलनेत आतिशी मार्लेना यांचं नाव आघाडीवर आहे. पक्षश्रेष्ठींच्या विश्वासू नेत्या म्हणून आतिशी यांची ओळख आहे. महिला आणि मंत्री असणं या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. आम आदमी पार्टीच्या स्थपनेनंतर पहिल्याच विधानसभा निवडणूकीचा जाहीरनामा आतिशी यांनी केला होता. त्यांच्याकडे सध्या पाच महत्त्वाची खाती आहेत.
महिला व बालविकास, शिक्षण, पर्यटन, कला, संस्कृती व भाषा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज या विभागांचा समावेश आहे. महिला वोट बॅंक आकर्षित करण्यासाठी आतिशी मार्लेचा यांचे नाव पुढे येऊ शकते. शिवाय विरोधकांना महिला मुख्यमंत्र्यावर टिका करणं अडचणीचं ठरेल.
नक्की वाचा - CM Arvind Kejriwal resigns : केजरीवाल का देत आहेत राजीनामा? काय आहे खरं कारण?
3 सौरभ भारद्वाजः अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि संजय सिंग जेलमध्ये असताना भाजप वर सडेतोड टिका करण्याचं काम सौरभ भारद्वाज यांनी केलं. उपराज्यपाल यांच्यावरही जोरदार प्रहार करण्याचं काम सौरभ भारद्वाज यांनी केलंय. त्यांच्याकडे सध्या मोठ्या खात्यांची जबाबदारी आहे. सरकार आणि संघटनात्मक पातळीवर त्यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.
4 कैलाश गेहलोत - अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांचे निष्ठावंत म्हणून कैलास गहलोत यांची ओळख आहे. केजरीवाल आणि सिसोदिया जेल मध्ये गेल्यावर संघटन स्तरावर गेहलोत यांनी चांगलं काम केलं.
परिवहन मंत्री म्हणून त्यांनी उत्तमरित्या जबाबदारी पेललीय. ओबीसी समाजातून आलेले गेहलोत यांचा उपयोग हरियाणा निवडणूकीत होऊ शकतो. शिवाय दिल्लीतील येत्या विधानसभा निवडणूकीत ओबीसी मतांना आकर्षित करण्यासाठी कैलास गेहलोत यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
5 गोपाळ रायः दिल्ली सरकारमधील ज्येष्ठ मंत्री गोपाळ राय यांचे नावही राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. गोपाळ राय हे शांत आणि संतुलित नेते आहेत. ज्येष्ठ नेते असल्याने पक्षात त्यांच्याबाबत आदर आहे. पक्षाच्या रणनीती मध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी गोपाळ राय मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होऊ शकतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world