डॉ. कविता राणे, प्रतिनिधी
गेली दहा वर्षे दिल्लीचं मुख्यमंत्रिपद भुषवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आम आदमी पक्षाच्या आतिशी सिंह (43) दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या आहेत. तब्बल 11 वर्षांनी दिल्लीला महिला मुख्यमंत्री मिळाली आहे. आतिशी मार्लेना सिंग यांची एकमताने दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड करण्यात आली आहे. आतिशी यांचा मुख्यमंत्रिपदापर्यंतचा हा प्रवास अत्यंत वेगाने घडलाय आणि तितक्याच वेगाने दिल्लीतील राजकीय घडामोडी घडत आहेत. अत्यंत कमी वयात, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेली उच्चशिक्षित महिला दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर आतिशी यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड करण्यात आली आहे. ही निवड नेमकी का झाली हे पाहण्याआधी आतिशी मार्लेना यांचा राजकीय प्रवास कसा होता, यावर नजर टाकूया.
नक्की वाचा - 'आप' मधील दिग्गज नेत्यांना मागे टाकत आतिशी कशा बनल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री?
कोण आहेत आतिशी मार्लेना सिंग?
आतिशी सिंह यांचा जन्म 8 जून 1981 रोजी पंजाबच्या एका राजपूत कुटुंबात झाला. त्यांचे वडील दिल्ली विश्वविद्यालयात प्रोफेसर होते. लहानपणापासून इतिहास आणि सामाजिक चळवळींकडे त्यांचा ओढा होता. मार्क्स आणि लेनिन या नावांपासून मार्लेना हा शब्द त्यांनी आपल्या नावात जोडला. ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्या भारतात परतल्या. सात वर्ष त्यांनी मध्यप्रदेशात विविध सामाजिक संस्थांसोबत काम केलं. शिक्षण, सार्वजनिक योजना या क्षेत्रात त्यांनी संशोधनात्मक काम केलं. आतिशी अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. 2013 पासून आम आदमी पक्षाच्या कामात त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. आपचा पहिला जाहीरनामा बनवणाऱ्या समितीच्या त्या प्रमुख होत्या.
2015 ते 2018 या काळात आतिशी यांनी मनीष सिसोदियांच्या सल्लागार म्हणून काम केले. त्यावेळी सिसोदिया हे दिल्लीचे शिक्षणमंत्री होते. दिल्ली सरकारच्या बहुचर्चित शाळाप्रकल्प आणि शैक्षणिक योजना तयार करण्यात आतिशी यांचा मोठा सहभाग होता. आतिशी या अरविंद केजरीवाल यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जातात. कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात मनीष सिसोदिया यांना 2023 ला अटक झाली. त्यानंतर केजरीवाल यांनी आतिशी यांना मंत्रिपद दिले आणि शिक्षण खात्यासह तब्बल 14 खात्यांचा कारभारही दिला. पहिल्यांदाच मंत्री झालेल्या आतिशी यांच्याकडे त्यावेळी दिल्ली सरकारमधील सगळ्यात जास्त खाती होत्या.
आतिशी यांची निवड मुख्यमंत्रिपदी कशी झाली?
पहिलं कारण – संकटकाळातील पक्षाचा चेहरा
आतिशी मंत्री झाल्यानंतर काही महिन्यातच अरविंद केजरीवाल यांनाही इडीने अटक केली. केजरीवालांच्या अनुपस्थितीत आतिशी यांनी दिल्ली सरकारची आणि आप पक्षाची सूत्र हाती घेतली. लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाची धुरा सांभाळली. हरियाणा सरकारकडून पाणी मिळत नाही म्हणून आमरण उपोषण केलं. त्यामुळे भाजप सरकारच्या विरोधातील आपचा चेहरा अशी आतिशी यांची ओळख झाली. पक्ष संकटात असताना आतिशी यांची ही भूमिका त्यांना पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये घेऊन गेली.
दुसरं कारण – उच्चशिक्षित महिला
आतिशी यांच्या उच्च शिक्षणामुळे पक्षात त्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं. योजना तयार करण्यातील त्यांचा अनुभव पक्षासाठी मोलाचा ठरलाय. दिल्लीतील मध्यमवर्ग आणि उच्चमध्यमवर्ग तसेच सुशिक्षित मतदारांमध्ये आतिशी यांना चांगला सन्मान आहे. आतिशी यांच्यासोबत आपमधून गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज आणि सुनिता केजरीवाल ही आणखी चार नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होती. सौरभ भारद्वाज आणि आतिशींचा मंत्रिमंडळातील समावेश एकत्रच झाला होता. पण अरविंद केजरीवाल यांचा आतिशींवर असलेला विश्वास त्यांना मुख्यमंत्रिपदापर्यंत घेऊन गेला.
आतिशी ठरल्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री
आतिशी फक्त सतरा वर्षांच्या होत्या तेव्हा भाजप नेत्या सुषमा स्वराज या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. पण फक्त 52 दिवसांसाठी. त्यानंतर काँग्रेसच्या शीला दीक्षीत या तब्बल 15 वर्ष दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.
अरविंद केजरीवाल जेलमध्ये असताना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही. मात्र जामीनावर मुक्तता होताच त्यांनी राजीनाम्याचा निर्णय का घेतला याचं उत्तर आपनं अजूनही दिलेलं नाही. पण आपनं मुख्यमंत्रिपदासाठी ज्या उच्चशिक्षित महिला चेहऱ्याची निवड केली, त्याने फक्त दिल्लीकरांचच नाही तर अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलंय. आतिशी यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून खूप मोठा कार्यकाळ मिळणार नाही. पण विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हॅपीनेस करिक्युलम, आनंदाचा अभ्यासक्रम आणणाऱ्या आतिशी आता दिल्लीकरांच्या आयुष्यात किती आनंद पेरतात त्यावर आतिशी आणि आप या दोघांचंही भवितव्य अवलंबून असेल, अशी प्रतिक्रिया तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world