Bhopal News: भोपाळमधील 'एम्स' रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याला लिफ्टमध्ये लुटल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. स्त्रीरोग विभागात कार्यरत असलेल्या वर्षा सोनी या रक्ताच्या पेढीमागील लिफ्टने जात असताना एका मास्क घातलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून नेले.
'एम्स' (AIIMS) सारख्या प्रतिष्ठित रुग्णालयात एका महिला कर्मचाऱ्याची लिफ्टमध्ये झालेली लूट केवळ सुरक्षेतील त्रुटी नाही. तर गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेने आरोग्य सेवा क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
लिफ्टमधील तो थरार
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने सुरक्षा व्यवस्था कमी होती, याचा फायदा चोरट्याने घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने वर्षांना लिफ्टमध्ये शिरून 'नेत्ररोग विभाग' कुठे आहे, असे विचारले. तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट पोहोचताच, बाहेर पडताना त्याने अचानक वर्षा यांच्या गळ्यातील सोन्याची मोत्यांची माळ आणि मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. वर्षा यांनी प्रतिकार केला असता चोराने त्यांना धक्का देऊन खाली पाडले आणि मंगळसूत्र घेऊन पळ काढला. ही सगळी घटना रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पाहा VIDEO
(नक्की वाचा- Bank Strike: बँकांचा आज देशव्यापी संप, कोण-कोणत्या बँका होणार सहभागी? काय आहेत मागण्या?)
सुरक्षेचा अभाव आणि पोलिसांची भूमिका
घटनेच्या वेळी लिफ्ट परिसरात एकही सुरक्षा रक्षक तैनात नव्हता. बराच वेळ पीडित महिला तिथे रडत बसली होती. त्यानंतर एका गार्डने त्यांना पाहिले. बागसेवनिया पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही अद्याप एफआयआर (FIR) नोंदवण्यात आलेला नाही, यामुळे संताप व्यक्त होत आहे.
'BNS' कायद्याचा परिणाम
या घटनेच्या निमित्ताने 'भारतीय न्याय संहिता' (BNS) या नवीन कायद्यातील तरतुदींवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. भोपाळमधील गुन्हेगारी वाढण्यामागे हे कायदेशीर बदल कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.
जुन्या कायद्यात दरोड, लुट, चेन स्नॅचिंग सारख्या प्रकरणांत 10 ते 14 वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद होता. तर नव्या बीएनएस कायद्यात कमाल 3 वर्षे कारावासाची तरतूद आहे. तसेच नव्या कायद्यात अटक देखील अनिवार्य नाही. आरोपींना नोटीस देऊन सोडू शकतात. शिक्षेची तीव्रता कमी झाल्यामुळे गुन्हेगारांमधील भीती संपली आहे की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.