गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात हलाल विरुद्ध झटका, औरंगजेबाची कबर या मुद्द्यावरुन एका समाजाला टार्गेट केलं जात आहे. भाजपच्या नेत्यांकडून यासंदर्भातील अनेक मुद्दे उकरून काढले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. महाराष्ट्रात अशी परिस्थिती असताना भाजपकडून मुस्लिमांसाठी ‘सौगात-ए-मोदी' योजना राबवली जात आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमावरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. अंबादास दानवे यांनी ट्वीट करीत सरकारच्या या योजनेचा समाचार घेतला आहे. तर अनेक राष्ट्रीय नेत्यांनी मोहिमेवर टीका केली आहे. महाराष्ट्र : घर में घुसकर मारेंगे..बिहार : घर में घुसकर बाटेंगे, शाल गुंडाळून फिरणारा नेपाळी आणि हैद्राबादी खाजा आता कुठे गेला! अशा आशयाचं ट्वीट अंबादास दानवे यांनी केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणे हे गेल्या काही काळापासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लीम नव्हता असं ही त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर हलाल-झटका मटण असो, औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा असो नितेश राणेंकडून वारंवार मुस्लीम समाजाला लक्ष केलं जात आहे. दरम्यान महाराष्ट्रातही हलाल आणि झटका मटणावरुन भाजपच्या नेत्यांकडून वाद निर्माण करण्यात आला.
नक्की वाचा - Maharashtra Politics: आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे आमनेसामने! जबरदस्त खुन्नस अन् स्वॅग; पाहा चर्चेतला VIDEO
काय आहे ‘सौगात-ए-मोदी' योजना?
रमजान ईदच्या काळात गरीब मुस्लीम नागरिकांना मदतीचा हात म्हणून भाजपकडून लाखो कुटुंबांना ‘सौगात-ए-मोदी' किटचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी दिली. भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे देशभरातील 32,000 पदाधिकारी स्थानिक मशिदींशी समन्वय साधून गरजू मुस्लीम कुटुंबीयांना ‘सौगात-ए-मोदी' किट वितरित करतील. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे स्वतः या मोहिमेवर लक्ष ठेवणार असल्याचे सिद्दीकी यांनी सांगितले. दिल्लीतील निजामुद्दीन येथून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. गरीब मुस्लिमांना ईद सण आनंदात साजरा करता यावा, या हेतूने मदत केली जात असल्याचे भाजपच्या अल्पसंख्याक सेलने स्पष्ट केले आहे.
‘सौगात-ए-मोदी' किटमध्ये काय असेल?
- खाद्यपदार्थ: शेवया, खजूर, ड्रायफ्रूट आणि साखर.
- महिलांसाठी: पंजाबी सूटसाठी कापड.
- पुरुषांसाठी: कुर्ता आणि पायजमा.
- प्रत्येक किटची किंमत: 500 ते 600 रुपये.