दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरावील यांच्या शरीरातील साखरेची पातळी वाढल्याचं समोर आलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या याचिकेवर गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आपलं उत्तर दाखल केलं. ईडीकडून वकील जुहैब हुसैन यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शरीरातील साखरेची पातळी वाढण्याचं कारण त्यांच्या घरून येणारं जेवण आहे. त्यांना घरातून बटाट्याची भाजी, पुरी, आंबे, मिठाई, गोडाचे पदार्थ पाठवले जात आहेत. वैद्यकीय आधारावर जामीन मिळवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं वकील हुसैन यांनी सांगितलं.
यावर अरविंद केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी ईडीच्या वकिलांकडून केलेल्या युक्तिवादाचा विरोध केला. ते म्हणाले की, त्यांची फास्टिंग शुगर 243 होती, जी खूप जास्त आहे. केजरीवालांना डॉक्टरांच्या सल्ल्याने जेवण दिलं जात आहे. तर ईडीने कोर्टाला सांगितलं की, अरविंद केजरीवाल साखरेचा चहा पित आहेत. ईडीचं उत्तर ऐकल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपली याचिका मागे घेतली आहे. केजरीवालचे वकील म्हणाले, ते सुधारित याचिका दाखल करतील. ईडीने सांगितलं की, आम्ही केजरीवाल यांच्या साखरेच्या पातळीबाबत तुरुंग प्रशासनाकडून अहवाल मागितला आहे आणि केजरीवाल यांचा डाएट चार्टही मागवला होता. केजरीवालांची फास्टिंग शुगर 173, 267 पर्यंत गेली आहे आणि हा आकडा चिंताजनक आहे. सर्वसाधारण साखरेची पातळी 120 पर्यंत असायला हवी. कोर्टाने सांगितलं की, तुरुंग प्रशासनाकडून केजरीवाल यांचा डाएट चार्ट मागतील. राउज एवन्यू कोर्टाता उद्या शुक्रवारी 18 एप्रिल रोजी यावर सुनावणी करण्यात येईल.
हे ही वाचा-अमेठीच्या प्रश्नावर राहुल गांधींनी सोडलं मौन, निवडणूक लढवण्यावर दिलं उत्तर
विशेष न्यायाधीश राकेश स्याल यांच्या समोर दाखल केलेल्या आपल्या याचिकेत केजरीवाल म्हणाले होते की, त्यांच्या शरीरातील सारखेची पातळी कमी-जास्त होत आहे. यासाठी आपल्या नियमित डॉक्टरांशी चर्चा करू इच्छितात. न्यायाधीशांनी ईडीला 18 एप्रिलपर्यंत त्यांचं उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. ईडीच्या वकिलांनी केजरीवाल यांच्या याचिकेचा विरोध केला. तुरुंगात अशा आजारांसाठी आवश्यक सुविधा आहेत, आणि त्यावर उपचार केले जाऊ शकतात असं ईडीच्या वकिलांकडून सांगण्यात आलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world