अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवा मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू झाली होती. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. दिल्लीला पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्री मिळाल्या आहेत. आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. आम आदमी पत्राच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी तसा प्रस्ताव ठेवला होता. यावेळी पक्षाच्या आमदारांनी त्यांच्या नावाला समर्थन दिलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
(नक्की वाचा - स्वातंत्र्यानंतर भारताला पहिल्यांदा पाठीचा कणा असलेलं परराष्ट्र धोरण मिळालं : अमित शाह)
मुख्यमंत्री पदासाठी आतिशी मार्लेना यांचं नाव आधीपासूनच आघाडीवर होतं. पक्षश्रेष्ठींच्या विश्वासू नेत्या म्हणून आतिशी यांची ओळख आहे. महिला आणि मंत्री असणं या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. आम आदमी पार्टीच्या स्थापनेनंतर पहिल्याच विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा आतिशी यांनी तयार केला होता. त्यांच्याकडे सध्या पाच महत्त्वाची खाती आहेत.
महिला व बालविकास, शिक्षण, पर्यटन, कला, संस्कृती व भाषा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज या विभागांचा समावेश आहे. महिला वोट बँक आकर्षित करण्यासाठी आतिशी यांच्या नावाचा पक्षाने विचार केला असावा. याशिवाय विरोधकांना महिला मुख्यमंत्र्यावर टिका करणं अडचणीचं ठरेल.
(नक्की वाचा- PM Modi Birthday : डिजिटल इंडिया ते कलम 370, देश बदलणारे हे आहेत मोदींचे 9 मोठे निर्णय)
कोण आहेत आतिशी?
आतिशी मार्लेना या दिल्लीच्या कालकाजी मतदारसंघातून आमदार आहेत. केजरीवाल सरकारमध्ये त्यांच्याकडे सर्वाधिक खात्यांची जबाबदारी आहे. माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. आतिशी दिल्ली सरकारमधील उच्चशिक्षित मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून इतिहासाची मास्टर्स पदवी घेतली आहे.