जाहिरात

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत रामलल्लाच्या आरतीचा पास कसा मिळवायचा? पाहा सर्वात सोपी पद्धत

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाच्या आरतीचे प्रत्यक्ष दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. 

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत रामलल्लाच्या आरतीचा पास कसा मिळवायचा? पाहा सर्वात सोपी पद्धत
Ayodhya Ram Mandir: अयोध्येत जाणाऱ्या रामभक्तांना आता आरती दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
मुंबई:

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाच्या आरतीचे प्रत्यक्ष दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.  श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने भाविकांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी आता थेट 'तत्काळ पास' (Tatkal Pass) देण्याची नवी सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे अयोध्येत जाणाऱ्या रामभक्तांना आता आरती दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहण्याची किंवा ऑनलाईन पास न मिळाल्यास हताश होण्याची गरज उरणार नाही.

कुठे मिळणार पास?

अयोध्येतील राम मंदिर प्रशासनाने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मुख्य द्वाराजवळच विशेष काउंटर सुरू केले आहे. बिर्ला धर्मशाळेसमोर असलेल्या 'यात्री सुविधा केंद्रात' या तत्काळ पाससाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज सकाळी 9 वाजल्यापासून या काउंटरवरून पास देण्यास सुरुवात होणार असून, उपलब्ध साठ्यानुसार ते भाविकांना दिले जातील. सध्या प्रायोगिक तत्त्वावर मर्यादित संख्येत पास दिले जात असून, आगामी काळात ही संख्या आणखी वाढवण्याचा ट्रस्टचा मानस आहे.

आरतीनुसार मिळणार तात्काळ पास

ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, रामलल्लाच्या विविध आरत्यांसाठी पास देण्याच्या वेळा आणि संख्या निश्चित करण्यात आली आहे.

1. मंगला आरती (सकाळी 4 वाजता) - या आरतीसाठी 1 दिवस आधी पास उपलब्ध होईल.
2. श्रृंगार आरती (सकाळी 6 वाजता) - या आरतीसाठीही 1 दिवस आधी पास घ्यावा लागेल.
3. भोग आरती (सकाळी 9 वाजता) - या आरतीसाठी त्याच दिवशी सकाळी पास मिळेल.

याशिवाय, दररोज रामलल्ला आरतीसाठी 45 आणि राम परिवार आरतीसाठी 15 तत्काळ पास दिले जाणार आहेत. सध्या ऑनलाईन पद्धतीद्वारे आरती दर्शनाचे 100 पास दिले जात आहेत, तर 75 रेफरल पास जारी केले जातात.

( नक्की वाचा : Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीतून 94 हजार नावे वगळली; तुमचं नाव यादीत आहे का? 'या' पद्धतीनं करा चेक )
 

तत्काळ पास काढण्याची सोपी पद्धत

तुम्ही अयोध्येत असाल आणि तुम्हाला तत्काळ पास हवा असेल तर ही प्रक्रिया फॉलो करावी लागेल. सर्वात आधी बिर्ला गेटजवळील तीर्थ क्षेत्र कार्यालयाच्या काउंटरला भेट द्यावी लागेल. सकाळी 9 नंतर पाससाठी अर्ज करता येईल. ओळखपत्रासाठी स्वतःचे मूळ आधार कार्ड सोबत ठेवणे बंधनकारक असणार आहे.  लहान मुलांसोबत पालक येत असतील तर मुलासोबतचा फोटोही सादर करावा लागेल.

ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या पालकांसाठी सुगम दर्शन

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ऑफलाईन 'सुगम दर्शन' पास फक्त ज्येष्ठ नागरिक आणि लहान बाळांसह येणाऱ्या पालकांसाठीच काउंटरवरून उपलब्ध केला जाईल. तर 'ॲडव्हान्स सुगम दर्शन' पास हा केवळ ऑनलाईन प्रणालीद्वारेच मिळेल. यासोबतच, मंदिरात नियमित दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या 2,743 दैनिक पासचे पुनरावलोकन सुरू असून, 6 महिन्यांची मुदत संपणाऱ्या पासचे नूतनीकरण केले जात आहे.

( नक्की वाचा : Fake Milk : तुमच्या घरातील दुधात शॅम्पू तर नाही ना? तुकाराम मुंढेंचा धक्कादायक खुलासा, असे ओळखा बनावट दूध )

भाविकांच्या सोयीसाठी ट्रस्टचा मोठा निर्णय

ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय यांच्यासह काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या आयडी बंद झाल्यानंतर विशिष्ट आणि सुगम दर्शन पास मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या सामान्य भाविकांना मोठा फटका बसत होता. ही अडचण दूर करण्यासाठी आणि भक्तांना थेट दिलासा देण्यासाठी ट्रस्टने ही तत्काळ पासची नवी यंत्रणा राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com