जाहिरात

Ram Temple: CCTV कॅमेरा झाकला, चोरीचे पैसे वॉशरुममध्ये लपवले; राम मंदिरातील कोट्यवधींच्या लुटीची Inside Story

Ayodhya Ram Mandir donation theft case: या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (SIT) अंतरिम अहवालातून अनेक मोठे खुलासे झाले आहेत.

Ram Temple: CCTV कॅमेरा झाकला, चोरीचे पैसे  वॉशरुममध्ये लपवले; राम मंदिरातील कोट्यवधींच्या लुटीची Inside Story
Ayodhya Ram Mandir donation theft case : या चोरीची सध्या संपूर्ण देशभर चर्चा आहे.
मुंबई:

Ayodhya Ram Mandir donation theft case : अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरातील दानपेटीतून कोट्यवधी रुपयांची रोकड चोरीला गेल्याची एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने अर्पण केलेल्या दानावर डल्ला मारण्यासाठी मंदिर परिसरातील कर्मचाऱ्यांनी एक अजब आणि तितकाच गुप्त प्लॅन तयार केला होता. 

या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (SIT) अंतरिम अहवालातून अनेक मोठे खुलासे झाले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राम मंदिर ट्रस्टचे दोन मोठे अधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सध्या या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 8 जणांची कसून चौकशी सुरू आहे.

छुपे कॅमेरे आणि चोरीची अजब पद्धत

राम मंदिरातील दानपेटीत जमा झालेली रक्कम जेव्हा बँकेत जमा केली जात होती, तेव्हा काहीतरी गडबड असल्याचे मंदिर प्रशासनाच्या लक्षात आले. सामान्यतः मंदिराच्या एका दानपेटीतून 6 लाख ते 7 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा होते. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून 500 रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये सातत्याने घट होत असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला. 

हा संशय बळावल्यानंतर पैसे मोजण्याच्या खोलीत गुप्त कॅमेरे बसवण्यात आले आणि या कॅमेऱ्यांनी चोरांचा संपूर्ण पर्दाफाश केला. गुप्त कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, पैसे मोजताना एक कर्मचारी मुद्दाम मुख्य सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या समोर उभा राहून तो झाकून टाकायचा. याच वेळेचा फायदा घेऊन त्याचा दुसरा साथीदार नोटांच्या बंडलमधून पैसे काढून स्वतःच्या कपड्यांमध्ये लपवायचा.

( नक्की वाचा : Ayodhya Ram Mandir: अयोध्येत थेट रामललाचा हार आणि चरण पादुकाच चोरीला? SIT च्या चौकशीत मोठे खुलासे )

 वॉशरुममध्ये लपवली जात होती रोकड

चोरीचा हा खेळ एवढ्यापुरताच मर्यादित नव्हता. कर्मचाऱ्यांनी बँकेत पैसे पाठवतानाही एक वेगळीच शक्कल लढवली होती. ते नोटांच्या प्रत्येक बंडलमध्ये काही जास्तीच्या नोटा टाकायचे. पैसे मोजताना केवळ बंडलची संख्या तपासली जायची, पण त्या बंडलमध्ये नेमक्या किती नोटा आहेत हे पाहिले जात नव्हते. त्यानंतर बँकेत पैसे नेताना हे कर्मचारी त्या जास्तीच्या नोटा काढून घ्यायचे. यामुळे वाउचरमधील रक्कम आणि बंडलची संख्या बरोबर जुळायची, मात्र प्रत्यक्षात मोठी रक्कम चोरीला जात होती. 

चोरी केलेली ही रोकड सुरुवातीला राम मंदिर संकुलातील वॉशरुम (बाथरूम) मध्ये लपवून ठेवली जायची. त्यानंतर योग्य संधी साधून ही रक्कम मंदिराबाहेर नेऊन सर्व आरोपींमध्ये वाटून घेतली जात होती.

( नक्की वाचा : Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिराच्या पैशांवर डल्ला मारणारे 6 संशयित कोण? SIT चौकशीत मोठे मासे अडकणार! )

 2024 पासून सुरू होता प्रकार

एसआयटीच्या अंतरिम अहवालानुसार, हा धक्कादायक प्रकार सन 2024 मध्ये राम मंदिर सुरू झाल्यापासूनच सुरू होता. या वर्षात केवळ 27 एप्रिल ते 5 जून या कालावधीतच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरीच्या तब्बल 70 घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणात टिन्नू यादव आणि सुभाष श्रीवास्तव या दोन मुख्य आरोपींच्या चौकशीतून काही बँक अधिकाऱ्यांची नावेही समोर आली आहेत. मं

दिरातून सुमारे 7 कोटी ते 7.5 कोटी रुपये गायब झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे, मात्र अधिकृत आकडा येणे अजून बाकी आहे. आतापर्यंत पोलिसांनी सुमारे 70 लाख रुपयांची रोकड जप्त केली असून त्याची मोजणी सुरू आहे.

कर्मचाऱ्यांची नियुक्ती कशी झाली?

या चोरीच्या मागे असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती कशी झाली, याबाबतही मोठा खुलासा झाला आहे. पैसे मोजण्याच्या टीममध्ये काम करणारे अनेक जण एकमेकांच्या ओळखीचे होते आणि त्यांनी शिफारशीच्या जोरावर या नोकऱ्या मिळवल्या होत्या. अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींमध्ये अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनीष कुमार यादव, करुणेश पांडे, रमाशंकर मिश्रा, सुभाष श्रीवास्तव आणि रामशंकर यादव उर्फ टिन्नू यांचा समावेश आहे. 

यापैकी अनुकल्प मिश्रा याने आपला मेहुणा लवकुश मिश्रा याला याच टीममध्ये समाविष्ट केले होते. तर चंपत राय यांचा ड्रायव्हर असलेल्या टिन्नू यादवने त्याचा चुलत भाऊ मनीष यादव याला पैसे मोजण्याच्या कामावर लावले होते. यापूर्वी आरोपी मिश्रा याच्या घरातून 10 लाख रुपये जप्त करण्यात आले होते.

अतिविश्वास आणि सुरक्षेतील मोठी हलगर्जी

पैसे मोजणीचे काम संपवून दररोज बाहेर पडणाऱ्या या कर्मचाऱ्यांची कोणतीही सुरक्षा तपासणी केली जात नव्हती. प्रशासनाच्या याच हलगर्जीपणामुळे चोरांचे धाडस वाढले. ते केवळ रोख रक्कमच नाही, तर भाविकांनी दानपेटीत अर्पण केलेले सोन्या-चांदीचे दागिने जसे की कानातले, नथ, बांगड्या आणि पैंजण देखील चोरत होते. यातील अविनाश शुक्ला नावाचा आरोपी तर चोरीचे पैसे थेट स्वतःच्या बँक खात्यात जमा करत होता. 

एसआयटीने मंदिर प्रशासनाच्या गेल्या 3 वर्षांच्या अंतर्गत ऑडिट रिपोर्टची तपासणी केली असता, दानपेट्यांची संख्या आणि नोंदी यामध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. मंदिरात सीसीटीव्ही कव्हरेज अपुरे होते आणि सुरक्षेचे नियम केवळ कागदावरच मर्यादित राहिले होते, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com