मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने एका तरूणाला अनोखी शिक्षा सुनावली आहे. या तरूणाने पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या होत्या. या प्रकरणी तरूणाला जामीन मंजूर करताना त्याला महिन्यातून दोन वेळा पोलिस स्टेशनला जावे लागणार आहे. तिथे तिरंग्याला त्याला 21 वेळेला सलाम ठोकावा लागणार आहे. सलाम ठोकताना प्रत्येक वेळी त्याला भारत माता की जय बोलावे लागणार आहे. या अटीवर त्या तरूणाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. रायसेन इथला हा तरूण असून त्याचे नाव फैजल उर्फ फैजान असे आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधिश डी. के पालिवाल यांनी जामीन देताना ही शिक्षा सुनावली आहे. महिन्याच्या पहिल्या आणि चौथ्या मंगळवारी स्थानिक पोलिस स्टेशनला जावून त्याला भारताच्या झेंड्याला 21 वेळा सलाम ठोकायचा आहे. शिवाय भारत माता की जय असेही बोलायचे आहे. आरोपी फैजल यांने पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या होत्या. 17 मे 2024 ला ही घटना घडली होती. तेव्हापासून तो अटकेत आहे. त्यानंतर त्याने आपल्याला जामीन मिळावा यासाठी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात अर्ज केला होता.
मात्र राज्य सरकारच्यावतीने त्याच्या जामीनाला विरोध करण्यात आला. फैजल हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी आहे. त्याने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्याने देशा विरोधात घोषणाबाजी केली आहे. ज्या देशात त्याचा जन्म झाला. ज्या देशात तो मोठा झाला. त्या देशा विरोधातच त्याने घोषणाबाजी केली आहे. त्यामुळे जामीन अर्ज फेटाळून लावावा अशी मागणी सरकारने केली. त्याच्या विरोधात या आधीही 13 गुन्हा दाखल आहेत ही बाबही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली.
ट्रेंडिंग बातमी - मोबाइलवर मालिका पाहू नको, आईने लेकाला हटकले, लेकाने भयंकर कृत्य केले
त्यानंतरही कोर्टाने आरोपीला 50,000 जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र हा जामीन मंजूर करताना कोर्टाने काही अटी आणि शर्ती लागू केल्या आहेत. जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत या अटी आणि शर्तींचे पालन करणे बंधनकारक राहाणार आहे असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार फैजल याला स्थानिक पोलिस स्थानकात महिन्यातून दोन वेळा जावे लागणार आहे. तिथे भारताच्या तिरंग्याला 21 वेळा सलाम करावा लागणार आहे. शिवाय भारत माता की जय बोलावे ही लागणार आहे.