- पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे
- तृणमूल काँग्रेसमधील जवळपास २० खासदार वेगळा गट स्थापन करून ममता बॅनर्जींपासून दूर झाले आहेत
- या बंडखोर खासदारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे
दिल्लीत एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. त्यामुळे दिल्लीतील लोकसभेतील समिकरणं बदलण्याची दाट शक्यता आहे. या घडामोडीमध्ये जवळपास 20 खासदार फुटले आहेत. ममता बॅनर्जींचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला. त्यानंतर त्यांच्या पक्षातील गळती थांबण्याचं नाव घेत नाही. आधी आमदारांचा एक मोठा गट त्यांच्या पासून वेगळा झाला. त्यानंतर आता पक्षातील खासदारांनीही त्यांच्यापासून अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षातील जवळपास 20 खासदारांनी ममता यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं समोर येत आहे. शिवाय ते वेगळा गट ही स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसच्या (TMC) सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना एका मागोमाग एक धक्के बसत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांनी पक्षात उभी फूट पाडत स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या बंडखोर खासदारांनी केवळ वेगळा गट स्थापन केला नाही, तर केंद्र सरकारमधील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणाही केली आहे. त्यामुळे लोकसभेत एनडीए आणखी भक्कम होणार आहे. त्यांनी टीएमसीच्या 20 खासदारांचे पाठबळ मिळणार आहे.
टीएमसीच्या बंडखोर खासदार डॉ. शर्मिला सरकार यांनी या फुटीला अधिकृत दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, 20 खासदारांचा गट मुख्य पक्षापासून वेगळा झाला आहे. आम्ही एनडीए सरकारला पाठिंबा देत आहोत. धक्कादायक बाब म्हणजे या बंडखोर गटाने स्वतःलाच 'खरी तृणमूल काँग्रेस' असल्याचा दावा केला आहे. या बंडखोर गटासोबत जवळपास 20 ते 21 खासदार असल्याचा दावा ही करण्यात आला आहे. त्यामुळे ही तृणमुल मधील मोठी फुट मानली जात आहे.
या नव्या गटाने संसदेतील आपली रणनीती आणि नेत्यांची नावेही जाहीर केली असल्याचे समोर आले आहे. संसदेत या बंडखोर गटाचे नेतृत्व काकोली घोष करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. डॉ. शर्मिला सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, काकोली घोष या नव्या गटाच्या 'चीफ व्हिप' (मुख्य प्रतोद) असतील असं ही त्यांनी सांगितलं. तर शताब्दी रॉय यांच्याकडे 'डेप्युटी लीडर' (उपनेत्या) म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. या मोठ्या राजकीय भूकंपामुळे ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. आता त्या काय निर्णय घेतात ते पाहावं लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world