जाहिरात

CBSE दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार! कोणते मार्क्स धरणार ग्राह्य? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं

CBSE Exam : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डानं 2026 या शैक्षणिक वर्षापासून 10 वी साठी वर्षातून दोन वेळा बोर्डाची परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

CBSE  दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार! कोणते मार्क्स धरणार ग्राह्य? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं
प्रतिकात्मक फोटो
मुंबई:

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डानं (CBSE) 2026 या शैक्षणिक वर्षापासून 10 वी साठी वर्षातून दोन वेळा बोर्डाची परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डानं यासाठी तयार करण्यात आलेल्या ड्राफ्टला मान्यता दिलीय. लोकांकडून सूचना आल्यानंतर याची अंमलबजावणी करण्यात येईल.

ही परीक्षा कधी असेल? कोणत्या परीक्षेतील मार्क्स ग्राह्य धरणार? कोणत्या विषयांसाठी परीक्षा देता येणार? एकदा परीक्षा दिल्यानंतर विषय बदलता येतील का? दुसऱ्या परीक्षेत पहिल्या परीक्षेपेक्षा कमी मार्क्स आले तर काय होणार? बोर्डानं हा निर्णय का घेतला आहे? या सर्व प्रश्नांचे उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

प्रश्न : 2026 मध्ये CBSE बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षा कधी होणार?

या ड्राफ्टनुसार पुढच्या वर्षी 10 च्या परीक्षेचा पहिला टप्पा 17 फेब्रुवारी ते 6 मार्चपर्यत घेण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 5 मे ते 20 मे पर्यंत होणार आहे. आत्तापर्यंत 10 ची परीक्षा एकदाच 32 दिवसांच्या कालावधीमध्ये होत होती. पण आता पुढच्या वर्षी दोनदा ही परीक्षा होणार आहे. दोन्ही टप्प्यात मिळून 16 +18 = 34 दिवसांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 

याचाच अर्थ विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या विषयांच्या आधारानं दोन पेपरमध्ये एक ते दोन दिवसांचा गॅप मिळेल. यापूर्वी दोन पेपरमध्ये पाच ते 10 दिवस गॅप होता. पहिल्या आणि दुसऱ्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र एकच असेल.

( नक्की वाचा : CBSE Exam : दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार, वाचा काय आहे प्रस्ताव? )

प्रश्न : दोन परीक्षांमध्ये अभ्यासक्रम काय असेल?

या दोन परीक्षा सेमिस्टरसारख्या अर्ध्या-अर्ध्या अभ्यासक्रमावर होणार नाहीत. संपूर्ण अभ्यासक्रमावर या परीक्षा होणार आहेत. थोडक्यात, दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन वेळा परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे. 

प्रश्न : दोन्ही परीक्षा देणे अनिवार्य आहे का? कधी करता येईल रजिस्ट्रेशन?

2026 मधील 10 वी बोर्डाच्या परीक्षेचं रजिस्ट्रेशन यावर्षी सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. तोपर्यंत विद्यार्थ्यांना ते दोन्ही परीक्षेत बसणार आहेत का? हे सांगावे लागेल. विद्यार्थी फक्त पहिली किंवा दुसरी परीक्षा देखील देऊ शकतात. रजिस्ट्रेशन करतानाच त्यांना ऑप्शनल विषय सांगावे लागतील. त्यानंतर त्यामध्ये काहीही बदल होणार नाही. त्याचबरोबर रजिस्ट्रेशनच्यानंतर कोणत्याही नव्या विद्यार्थ्याला परीक्षा देता येणार नाही. 

पहिल्या परीक्षेचा निकाल एप्रिल महिन्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांनाच ती परीक्षा देता येईल. अर्थात त्यामध्येही त्यांना पुन्हा परीक्षा द्यायची की नाही? हे ठरवण्याचे स्वातंत्र्य असेल. 

उदाहरणार्थ : एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या परीक्षेत इंग्रजी विषयात 70 मार्क्स मिळाले. त्यानंतर त्याला या पेक्षा जास्त मार्क्स मिळणे शक्य नाही, असं वाटलं तर तर तो विद्यार्थी इंग्रजीचा पेपर पुन्हा न देण्याचा पर्याय निवडू शकतो. 

प्रश्न : कोणत्या परीक्षेचे मार्क्स ग्राह्य धरणार?

एखाद्या विद्यार्थ्यांनं दोन्ही वेळा दहावीची परीक्षा दिली तर त्याचे सर्वोत्तम मार्क्सच ग्राह्य धरले जातील. उदाहरणार्थ : पहिल्या परीक्षेत त्याला इंग्रजीमध्ये 70 तर दुसऱ्यात 69 मार्क्स मिळाले. तर त्याला इंग्रजीमधील पहिल्या परीक्षेत मिळालेले 70 मार्क्सच ग्राह्य धरले जातील. 

प्रश्न : अंतिम निकाल कधी लागेल?

20 एप्रिल 2026 रोजी पहिल्या परीक्षेचा निकाल लागेल. हा निकाल डिजीलॉकरमध्ये उपलब्ध असेल. ज्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्यांदा परीक्षा देण्याचा निर्णय घेतलेला नाही त्यांना याच मार्क्सच्या आधारावर 11 वी मध्ये प्रवेश मिळेल. पण, पहिल्या परीक्षेनंतर पासिंग सर्टिफिकेट जारी केले जाणार नाहीत. दुसऱ्या परीक्षेच्या अंतिम निकालानंतर 30 जूनपर्यंत हे सर्टिफिकेट देण्यात येईल. 

प्रश्न :  दोनदा परीक्षा का होत आहेत?

या ड्राफ्टनुसार कोचिंग क्लासेलची गरज समाप्त करण्यासाठी बोर्डानं या परीक्षांच्या सध्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय धेतला आहे. मुलांमधील सम्रग विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी या परीक्षांना नवं रुप देण्यात आलं आहे.  

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या या सर्व गोष्टींचा फक्त ड्राफ्ट तयार करण्यात आला आहे. लोकांच्या सूचनांवर विचार करुन त्याला अंतिम रुप दिले जाईल. त्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: