Fast Food Habit: फास्ट फूडने घेतला जीव! आतड्याला छिद्र पडलं, 11 वीच्या विद्यार्थिनीचा तडफडून मृत्यू

अहानाचे नातेवाईक साजिद खान यांनी सांगितले की, फास्ट फूडच्या अतिसेवनामुळे अहानाच्या आतड्यांना छिद्र पडले होते. ती जे काही खायची, ते पचण्याऐवजी बाहेर निघून जात होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

Fast Food Side Effect: धावपळीच्या युगात तरुणाईमध्ये फास्ट फूडची क्रेझ वाढली आहे. मात्र फास्टफूड सतत खाण्याची सवय एका विद्यार्थिनीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं आहे. अमरोहा येथील कटकुई मोहल्ल्यात राहणाऱ्या अहाना नावाच्या विद्यार्थिनीचा पोटातील गंभीर संसर्गामुळे मृत्यू झाला. अहानाने घरचे जेवण सोडून केवळ बाहेरील चटपटीत पदार्थांवर भर दिल्याने ही जीवघेणी वेळ ओढवल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

अहाना गेल्या अनेक महिन्यांपासून सतत पिझ्झा, बर्गर, मोमोज यांसारख्या फास्ट फूडचे सेवन करत होती. काही दिवसांपूर्वी तिच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. स्थानिक रुग्णालयात उपचार केल्यानंतरही आराम न मिळाल्याने तिला दिल्ली येथील AIIMS मध्ये हलवण्यात आले. एम्सचे प्रोफेसर सुनील सुम्भा यांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला.

(नक्की वाचा-  Kolhapur Robbery: कोल्हापुरात धावत्या बसवर दरोडा! 60 किलो चांदी, सोनं, रोख पैशांसह कोट्यवधी लुटले)

आतड्यांना पडले होते छिद्र

अहानाचे नातेवाईक साजिद खान यांनी सांगितले की, फास्ट फूडच्या अतिसेवनामुळे अहानाच्या आतड्यांना छिद्र पडले होते. ती जे काही खायची, ते पचण्याऐवजी बाहेर निघून जात होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण संसर्ग एवढा पसरला होता की तिला वाचवणे अशक्य झाले.

तज्ज्ञ काय म्हणतात?

अमरोहा सीएससीचे वरिष्ठ फिजीशियन मुमताज अंसारी यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. "फास्ट फूडमुळे मुलांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर थेट परिणाम होतो. त्यातील हानिकारक घटक आतड्यांना सूज आणतात आणि गंभीर संसर्ग निर्माण करतात. यामुळे 'इंटेस्टाइनल परफोरेशन्स' सारख्या जीवघेण्या समस्या उद्भवू शकतात," असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

(नक्की वाचा-  पुणे-मुंबई महामार्गावरील सोमटणे फाटा, वरसोली टोलनाके बंद पाडणार; आमदार सुनील शेळकेंचा इशारा)

पालकांना आवाहन

अहानाच्या मृत्यूने तिचे कुटुंब पूर्णपणे कोलमडले आहे. "तुमच्या मुलांना फास्ट फूडपासून दूर ठेवा आणि केवळ घरचा सकस आहार द्या," असे कळकळीचे आवाहन अहानाच्या वडिलांनी सर्व पालकांना केले आहे. दरम्यान, एम्स प्रशासनाने अद्याप तिच्या मृत्यूच्या कारणाबाबत अधिकृत मेडिकल रिपोर्ट प्रसिद्ध केलेला नाही.

Topics mentioned in this article