घसा खवखवणे किंवा खोकला झाल्यास मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन थेट 'कफ सिरप' (Cough Syrup) खरेदी करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 9 जून रोजी जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, आता खोकल्याच्या सिरपसह सर्व प्रकारच्या सिरप-आधारित औषधांची 'ओव्हर द काउंटर' म्हणजेच विना-प्रिस्क्रिप्शन विक्री थांबवण्यात आली आहे. आता ही औषधे खरेदी करण्यासाठी नोंदणीकृत डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन अनिवार्य असणार आहे.
या संदर्भातील मसुदा अधिसूचना गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातच जारी करण्यात आली होती. या आदेशावर संबंधित भागधारकांकडून कोणताही आक्षेप किंवा हरकत न आल्याने, आता सरकारने अधिकृतपणे राजपत्रात ही अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
नियमात मोठा बदल
या नवीन अधिसूचनेद्वारे केंद्र सरकारने भारताच्या ड्रग्ज रूल्स, 1945 मध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण दुरुस्ती केली आहे. या अंतर्गत, 'शेड्युल K'च्या काही नियामक तरतुदींमधून ज्या औषधांना सूट देण्यात आली होती, त्या श्रेणीमधून सिरप हा शब्द आता पूर्णपणे हटवण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)
बदलाचा मुख्य तपशील
कफ सिरप आणि इतर सिरप-आधारित औषधे आता शेड्युल K, अनुक्रमांक 13, आयटम नंबर (7) सवलत सूचीमध्ये समाविष्ट नसतील.
शेड्युल K म्हणजे काय?
या शेड्युलमध्ये अशा औषधांचा समावेश होतो, ज्यांना विशिष्ट अटींनुसार 'ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट/रूल्स'च्या काही कठोर नियमांमधून आणि आवश्यकतांमधून सूट दिलेली असते. आता ही सूट काढून घेतल्यामुळे सिरपच्या विक्रीवर कडक नियंत्रण असणार आहे.
(नक्की वाचा- Mumbai-Pune: मुंबई-पुणे सुसाट! अवघ्या 48 मिनिटात पूर्ण होणार प्रवास; रेल्वे मंत्रालयाचा मास्टरप्लॅन)
निर्णयाचा काय परिणाम होईल?
आता किरकोळ खोकला किंवा आजारपणासाठी स्वतःच्या मनाने मेडिकलमधून सिरप आणता येणार नाही. आधी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी लागेल आणि त्यांच्या चिठ्ठीनंतरच औषध मिळेल. डॉक्टरांच्या वैध चिठ्ठीशिवाय कोणत्याही ग्राहकाला सिरप दिल्यास मेडिकल स्टोअर्सवर कडक कायदेशीर कारवाई किंवा परवाना रद्द होण्याची कारवाई होऊ शकते. कफ सिरपच्या होणाऱ्या गैरवापरावर किंवा अंमली पदार्थ म्हणून होणाऱ्या नशेच्या वापरावर या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात लगाम बसेल.
शासनाचा हा निर्णय देशातील औषध प्रणाली अधिक सुरक्षित आणि नियंत्रित करण्यासाठी उचललेले एक मोठे पाऊल मानले जात आहे.