- सीआरपीएफचे जवान संजय तिवारी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शौर्य चक्र प्रदान करण्यात आले आहे
- तिवारींनी लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी उस्मान लाहौरी याला श्रीनगरमध्ये कंठस्नान घातले होते
- २ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री सुरक्षा दलांनी उस्मान लाहौरीच्या घराला वेढा घातला आणि त्याला ठार केले
सीआरपीएफचे (CRPF) शूर जवान संजय तिवारी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 'शौर्य चक्र' प्रदान करण्यात आले. तिवारी यांनीच लष्कर-ए-तैयबाचा खतरनाक दहशतवादी उस्मान लाहौरी याला कंठस्नान घातले होते. 8 जून 2026 रोजी नवी दिल्लीत पार पडलेल्या संरक्षण अलंकरण समारंभात त्यांना या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले आहे. या बहुमानानंतर 10 जून रोजी संजय तिवारी पहिल्यांदाच आपल्या गृहगावी, मध्य प्रदेशातील रीवा येथे पोहोचले होते. जिथे त्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. त्यावेळी गावाने त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतले.
श्रीनगरमधील एका घरात दहशतवादी उस्मान लाहौरी लपला होता. याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. 2 नोव्हेंबर 2024 रोजीची ही घटना आहे. रात्री जवळपास 2:45 च्या सुमारास सुरक्षा दलांनी या घराला वेढा घातला. संजय तिवारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दहशतवाद्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते, परंतु त्याने गोळीबार सुरू केला होता. पण काही वेळाने समोरून गोळीबार थांबला. गोळीबार थांबल्यामुळे तो ठार झाला असावा असे आम्हाला वाटलं असं त्यांनी सांगितलं.
पण खरा थरार पुढे होता. ते पुढे सांगतात, त्यानंतर आम्ही खोलीत प्रवेश केला. त्यावेळी तो जिवंत होता. मग त्याने अचानक हल्ला केला. मला मान, पोट आणि डाव्या मांडीवर 3 गोळ्या लागल्या असं तिवारींनी सांगितलं. या हल्ल्यात प्रचंड रक्तस्त्राव होत होता. पण मी माघार घेतली नाही असं त्यांनी सांगितलं. काही झालं तर लाहौरीला सोडायचं नाही असा निश्चय केला होता. दोघांमध्ये समोरा समोर फायरिंग झाली. पण पुढच्याच क्षणी झालेल्या चकमकीत लाहौरीला यमसदनी धाडले असं तिवारींनी सांगितले. त्यावेळी समाधान झाल्या सारखे वाटले.
संजय तिवारी 2011 मध्ये सीआरपीएफमध्ये भरती झाले होते. त्यांच्या 15 ते 16 वर्षांच्या कारकिर्दीतील 5 वर्षे त्यांनी काश्मीरमध्ये घालवली आहेत. विशेष म्हणजे, आपल्या गावात ते केवळ 10 ते 12 तासांसाठीच आले होते. पण त्यांच्यासाठी ही भेट खुप मोलाची होती. कुटुंबिय, नातेवाईक आणि गावकरी यांच्या भेटीने ते भारावून गेले होते. कौटुंबिक भेटीनंतर ते तात्काळ श्रीनगर येथे पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्यासाठी गेले. त्यांच्या या अजोड देशप्रेमामुळे संपूर्ण रीवा जिल्ह्याचे नाव देशात अभिमानाने उंचावल्याचे गावकरी आवर्जून सांगतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world