Delhi Blast Update: देशाची राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ सोमवारी, 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटामुळे मोठी खळबळ उडाली आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 जवळ सुभाष मार्गावरील ट्रॅफिक सिग्नलजवळ उभ्या असलेल्या Hyundai i20 कारमध्ये हा स्फोट झाला. या भीषण घटनेत आतापर्यंत 9 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सुमारे 20 लोक जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका शक्तिशाली होता परिसरात त्याचे हादरे जाणवले.
सीसीटीव्ही फुटेजमधून मोठे खुलासे
पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून तपासासाठी अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. स्फोट झालेली पांढऱ्या रंगाची i20 कार स्फोटापूर्वी तीन तासांहून अधिक काळ सुनहरी मशिदीजवळच्या पार्किंग लॉटमध्ये उभी असल्याचे फुटेजमध्ये दिसले आहे. दुपारी 3.19 वाजल्यापासून संध्याकाळी 6.48 वाजेपर्यंत ही कार तिथे होती.
पाहा- CCTV Footage
कार पार्किंगमधून बाहेर पडून ट्रॅफिक सिग्नलजवळ येताच, संध्याकाळी 6.52 वाजता त्यामध्ये हा भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर परिसरातील लोकांनी सुरक्षिततेसाठी धावपळ केल्याचे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे.
(नक्की वाचा : दिल्लीत स्फोटांची मालिका...कधी अन् कुठे झाले होते भीषण स्फोट? लाल किल्लाही हादरला होता, वाचा A To Z माहिती)
दहशतवादी हल्ल्याचा संशय
अधिकारी या घटनेकडे दहशतवादी हल्ला म्हणून संशय व्यक्त करत आहेत आणि तपासाची व्याप्ती वाढवली आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी कारचा नोंदणीकृत मालक असलेल्या मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीला हरियाणातील गुरुग्राम येथून ताब्यात घेतले आहे. सलमानने ही कार पुढे विकल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून, कार जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील एका व्यक्तीला विकल्याचे वृत्त आहे.
( नक्की वाचा : Delhi Blast : शक्तीशाली स्फोटानं लाल किल्ला हादरला! 'दहशतवादी अँगल'ची शक्यता? वाचा 10 मोठे मुद्दे )
दिल्लीत हायअलर्ट
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने घटनास्थळी आणि रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. NIA, NSG आणि FSL च्या टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या असून, सर्व अँगलने तपास सुरू आहे. या स्फोटामुळे राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. स्फोटात अनेक वाहने जळून खाक झाली आणि आजूबाजूच्या इमारतींनाही हादरे बसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.