Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी सायंकाळी महाकुंभला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 14, 15 आणि 16 वर मोठी गर्दी जमा झाली आणि यात झालेल्या चेंगराचेंगरीत मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात तीन मुलांसह 18 जणांचा मृत्यू झाला आहे आणि १० जण जखमी आहेत.
महाकुंभला जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या उशीरा धावत असल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक 14, 15 वर मोठी गर्दी जमा झाली होती. त्यामुळे एक्स्प्रेस रेल्वे स्थानकावर येताच प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली. त्यातून गाडीत चढण्यासाठी चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांना 10 लाख, गंभीर जखमी झालेल्यांना 2.5 लाख आणि किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना एक लाख निधी दिला जाणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं आहे.
नक्की वाचा - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...
शनिवारी रात्री दिल्ली रेल्वे स्थानकावर नेमकं काय घडलं?
- दिल्ली रेल्वे स्थानकावर रात्री 8 पासून गर्दी होण्यास सुरूवात
- प्रयागराजला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी
- दिल्ली रेल्वे स्थानकाच्या 13 आणि 14 फलाटावर तुफान गर्दी
- प्लॅटफॉर्मवर गाडी येताच लोकं गाडीकडे धावले
- पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले
- मात्र लोकांनी ट्रेनच्या दिशेने धाव घेतल्याने चेंगराचेंगरी झाली
- 9.30च्या दरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली
- 9 वाजून 55 मिनिटांनी फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आले
- स्वतंत्रता सेनानी ट्रेन आणि भुवनेश्वर राजधानी रेल्वेसाठी गर्दी
- प्रयागराज एक्स्प्रेसही 10 वाजून 10 मिनिटांनी सुटणार होती
- यावेळी काही तासात हजारांहून अधिक जनरलच्या तिकीटांची विक्री झाली
- याचवेळी ट्रेनचे फलाट बदलल्याची अफवाही पसरली
- एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाताना धावपळ
- शिड्यांवरून पळताना चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना