Delhi Violence: नवी दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मार्चदरम्यान झालेल्या हिंसाचाराला आता मोठे राजकीय आणि आंतरराष्ट्रीय वळण मिळाले आहे. दिल्लीत झालेल्या या तुफान राड्यात थेट पाकिस्तान कनेक्शन असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय. या हिंसक आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 70 जणांना ताब्यात घेतले असून, धक्कादायक बाब म्हणजे ताब्यात घेतलेल्यांमध्ये एकाही विद्यार्थ्याचा समावेश नाही.
सोशल मीडियावर पाकिस्तानचा छुपा खेळ?
या आंदोलनादरम्यान भडकलेल्या हिंसाचारामागे मोठा कट रचण्यात आल्याचा संशय दिल्ली पोलिसांना आहे. पाकिस्तानमधील वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडल्सवरून या हिंसाचाराबाबत सतत खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. एका पाकिस्तानी ट्वीटमध्ये तर हिंसाचारात 7 आंदोलकांचा मृत्यू, 391 जण जखमी आणि 250 जणांना अटक झाल्याचा बनावट दावा करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर पोलीस आता पाकिस्तान अँगलने सखोल तपास करत आहेत. हिंसाचार भडकवण्यात जर कोणत्याही राजकीय पक्षाची भूमिका समोर आली, तर त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.
(नक्की वाचा : Amravati News : 'मठात पत्नीसारखे ठेवले, भक्तांना लुटले', भोंदुबाबाच्या काळ्या चेहऱ्यानं अमरावती हादरले )
50 हून अधिक पोलीस जखमी
संसद मार्च दरम्यान झालेला हिंसाचार अत्यंत भीषण होता. या हिंसाचारात 5 पेक्षा जास्त आयपीएस अधिकाऱ्यांसह 50 हून अधिक पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान गंभीर जखमी झाले आहेत. दुसऱ्या एका आकडेवारीनुसार, उपचारादरम्यान 17 पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान जखमी झाल्याची नोंद झाली आहे.
या संपूर्ण हिंसाचाराप्रकरणी पोलीस एकापाठोपाठ एक अनेक गुन्हे दाखल करत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणांवरून उपद्रव करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, उपलब्ध व्हिडिओ फुटेजच्या आधारे इतर हिंसक घटकांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
( नक्की वाचा : लोकसभेत आता कोणाचे किती खासदार? ठाकरे गटाच्या 6 खासदारांच्या विलीनीकरणानंतर वाचा सर्व पक्षांची ताजी आकडेवारी )
दिल्ली पोलिसांनी काय सांगितलं?
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत दिल्ली पोलिसांनी नागरिकांना आणि आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही बेकायदेशीर किंवा हिंसक कारवायांमध्ये सहभागी होऊ नका आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या सूचनांचे पालन करा, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
त्याचप्रमाणे, सोशल मीडियावरील कोणत्याही अपुष्ट बातम्या किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पुढे पसरवू नका, असे सांगत नागरिकांनी केवळ अधिकृत आणि विश्वसनीय माहितीवरच विश्वास ठेवावा, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world